प्रेमभावना व्यक्त होणार ‘एक कप कॉफी’मधून
व्हॅलेंटाईन डे… प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. खरंतर प्रेम हे फक्त प्रेमी युगुलांमध्येच असते असे नाही, तर प्रत्येक नात्यात प्रेम असते, आई मुलाच्या नात्यात, वडील मुलीच्या नात्यात, भावा-बहिणीच्या नात्यात, मित्र मैत्रिणीच्या नात्यात. नात्यातील हेच ऋणानुबंध जपत व्हॅलेंटाईनची नवीन व्याख्या घेऊन येत आहे, एक कप कॅाफी… फ्लॉसम एंटरटेनमेंट प्रस्तुत या रोमँटिक गाण्याच्या निमित्ताने गौरव घाटणेकर आणि नम्रता गायकवाड ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे ब्लूज सॉंग आहे. अशा प्रकारच्या गाण्यातून कथा सांगण्यापेक्षा भावना जास्त व्यक्त केल्या जातात आणि हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच घडत आहे. आदित्य बर्वे यांचे दिग्दर्शन, संगीत आणि बोल लाभलेले हे गाणे आशिष जोशी यांनी गायले आहे. १४ फेब्रुवारी रोजी हे गाणे आपल्या भेटीला येणार असून व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर मोशन पोस्टरने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याबद्दल अभिनेत्री नम्रता गायकवाड म्हणते, ” ‘एक कप कॉफी हे गाणं आणि टायटल माझ्या मनाला खूप भावले. मराठीतील हे पहिले ब्लूज सॉंग आहे आणि ते सादर करण्याची संधी मला मिळाली. कॉफी हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रेम, मैत्री, सुखदुःख, कोणत्याही मूडमध्ये कॉफी आपल्याला साथ देते. कोणत्याही नात्याची सुरुवातही अनेकदा कॉफीपासूनच होते, मनाला स्पर्श करणाऱ्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॅासम एंटरटेनमेंटसोबत याआधीही मी ‘मन घुमतया’ हे एक प्रेमगीत केले होते, जे ग्रामीण भागात बहरले होते. आता ‘एक कप कॅाफी’ या गाण्यातील प्रेम शहरी अंदाजात बहरत आहे. हे गाणेही तुम्हाला नक्कीच आवडेल.”