प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदन उटी व मोगरा उत्सव
मोग-याच्या सुवासिक फुलांसह संत्री, आंबा, मोसंबी, अननस, सफरचंदासारख्या ५ हजार ५५५ फळांचा महानैवेद्य प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दाखविण्यात आला. तब्बल १०० किलो मोग-याच्या सुवासिक फुलांनी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. तर, भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या भजन-कीर्तनाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले.
निमित्त होते, श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित वासंतिक चंदन उटी व मोगरा उत्सवाचे. यावेळी भारतीय वारकरी भजनी मंडळाचा भजन-कीर्तन कार्यक्रम देखील झाला.
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे मंदिर गाभा-यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत मोग-याची फुले आणि विविध फळांची आकर्षक सजावट करण्यात आली. सर्व फळे ताराचंद रुग्णालयातील रुग्णांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत.मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित मोगरा महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.