Entertainment

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित शिवरायांचा छावा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

Share Post

मराठी ऐतिहासिक चित्रपटांसाठी आजच्या काळात नावाजलेले एकमेव नाव म्हणजे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. त्यांचा आगामी चित्रपट हा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे द्वितीय राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आहे. दिग्पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर सेटवरील नुकतीच पोस्ट शेअर करत शूटींग पूर्ण झाल्याची महिती दिली आहे.

माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.
असा विश्वास दिग्पाल ने व्यक्त केला

छत्रपती संभाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या कथेबद्दल बोलताना निर्माते सनी रजानी सांगतात की “माझ्या पहिल्याच चित्रपटाचे ‘शिवरायांचा छावा’ चे चित्रीकरण सलग ३३ दिवसांच्या विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दिग्पाल सरांसोबत काम करणे हा आमच्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव होता. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारा अभ्यासू दृष्टिकोन हा त्यांच्या सेटवरील प्रत्येक कामातून दिसून येत होता. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले आहे. आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केले आहे त्यांच्यापैकी दिग्पाल सर एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या विषयावर इतके संशोधन केले आहे. त्यांची इतिहासाबद्दल आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, मल्हार पिक्चर्स कंपनीची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट सादर करताना मला खूप अभिमान वाटतो. मला खात्री आहे की हा चित्रपट रसिक प्रेक्षक देखील आनंदाने स्वीकारतील आणि ही मोहीम यशस्वी करतील.”

असोसिएट प्रोड्युसर भावेश रजनीकांत पंचमतिया म्हणाले की , “शिवरायांचा छावा चित्रपट निर्मिती करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करणे म्हणजे पर्वणी आहे. त्यांची ऊर्जा आणि चित्रीकरण शैली मनाला भावली. संपूर्ण कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी केलेली मेहनत खरोखरच दाद देण्याजोगी आहे. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून त्यांच्या जीवनावर कायमचा प्रभाव टाकेल.”

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, सनी रजानी आणि वैभव भोर निर्मित “शिवरायांचा छावा” या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या साहसाची आणि शौर्याची गाथा मांडण्यात आली आहे. हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *