“पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते.”
डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या ‘सुमी’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही ‘सुमी’ याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘सुमी’ प्रत्येकाने पाहावा असाच आहे. ‘सुमी’ जिची भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या ‘सुमी’ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून याव्यतिरिक्त या चित्रपटात दिवेश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन -रोहन यांनी संगीत दिले आहे.
ही कहाणी फक्त ‘सुमी’ची नसून तिच्या आईवडिलांचीही आहे. ‘सुमी’ची शिक्षणाची ओढ पाहता, तिचे आईवडील यासाठी तिला साथ देताना दिसत आहेत. शिक्षण घेण्याचा तिचा अट्टाहास आणि त्यासाठी सुमी आणि तिच्या पालकांचा संघर्ष यात दिसतोय. “पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते” असं म्हणणारी ‘सुमी’ ची आई ही तेवढीच महत्वाकांक्षी व जिद्दी असल्याचे दिसून येतेय. आता ‘सुमी’चे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते की, तिला शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागतो, हे ‘सुमी’ पाहिल्यावरच कळेल. समाजात स्त्रियांचे काम चूल आणि मुलं इतकेच नसून मुलीला शिकवणे किती महत्वाचे आहे, हा संदेश यात देण्यात आला असून ‘सुमी’मध्ये कधी भांडणाऱ्या तर कधी एकमेकांना मदत करणाऱ्या आकांक्षा आणि दिवेशची निखळ मैत्री पाहायला मिळत आहे. सहज प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाणारा, सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला दाखवावा असा आहे. ‘सुमी’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ‘सुमी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बालदिनानिमित्ताने ही बालदोस्तांसाठी आमची खास भेट आहे. सिनेमा जरी बालदिनानिमित्ताने प्रदर्शित केला असला तरी तो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाने पाहावा, असा आहे. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये ‘सुमी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट आणि चित्रपटातील दोन्ही बालकलाकारांना ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘सुमी’ ही एका महत्वकांक्षी मुलीची कहाणी असून हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.”
दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, ” ‘सुमी’ हा चित्रपट आमच्या संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होता. मुळात या चित्रपटातील दोन्ही बालकलाकार हे नवखे आहेत. ही त्यांची पहिलीच फिचर फिल्म असून चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवत नाही. आकांक्षा व दिवेश या दोघांची ऑनस्क्रीन मैत्री जितकी घट्ट आहे, तशीच मैत्री ऑफस्क्रीनही आहे. शूटिंगदरम्यान एकमेकांना खूप मदत केली. दोघांनीही एकमेकांना खूपच समजून घेतले आणि एकमेकांना प्रोत्साहन दिले. सुमीच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद उत्तम असून चित्रपटालाही असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो.”
अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन्स, ए. ए. क्रिएशन्स, फ्लायिंग गॉड फिल्म्स निर्मित ‘सुमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे. तर या चित्रपटाला प्रसाद नामजोशी यांचे संवाद आणि गीत लाभले आहे.