पैठणी नेसून, मनमोहक अदांनी घायाळ करणार गिरीजा ओक
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही गोष्ट आहे एका अशा गृहिणीची, जिचे पैठणी घेण्याचे स्वप्न आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक प्रवास आहे. नुकतीच ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटातील एक ठसकेबाज लावणी सर्वांच्या भेटीला आली आहे. ‘तुमच्यासाठी रेडी राया नेसून पैठणी’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडे यांच्या आवाजाने या लावणीला चारचांद लागले आहेत. तर या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक – गणेश यांचे आहे. गिरीजा ओक -गोडबोले आणि मिलिंद गुणाजी यांच्यावर चित्रित या गाण्यात पैठणीचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, ” महाराष्ट्राचे महावस्त्र असणाऱ्या पैठणीचे सौंदर्य प्रत्येकाला भारावणारे आहे. या चित्रपटात ‘पैठणी’ सुद्धा एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे. पैठणीचे सौंदर्य आम्ही या लावणीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर बोल असणारी ही लावणी ठेका धरायला लावणारी आहे. गाण्याच्या रेकॅार्डिंगदरम्यान बेलाही खूप एन्जॅाय करून गात होती. त्यामुळे तिला बघून आम्हीही हे गाणं तितकंच एन्जॅाय केले.’’
गायिका बेला शेंडे म्हणतात, ‘’ या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना मलाही खूप मजा आली. हे गाणं गाताना आम्ही एवढी धमाल केली तर प्रेक्षकांना तर हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल.’’
प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” चित्रपटाच्या कथेला साजेसे असे हे गाणे आहे. बेला शेंडे यांचा आवाज आणि माणिक – गणेश यांचे बोल, संगीत लाभलेले हे गाणे खूपच बहारदार आहे. यात अधिक भर पडली आहे ती सुंदर पैठणी नेसलेल्या गिरीजाची. गिरीजाच्या नृत्यानं या लावणीला अजून रंग चढला आहे.”
‘गोष्ट एका पैठणीची’ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.