NEWS

पूर्व भागात प्रभात मित्र मंडळाची पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मिरवणूक उत्साहात

Share Post

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला…रांगोळीच्या पायघडया व फुलांची उधळण, मर्दानी खेळाचे सादरीकरण… आणि रथावर विराजमान झालेली शिवरायांची भव्य मूर्ती… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक मिरवणूक सोहळा हे मुख्य आकर्षण ठरले.यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नरवीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख अविनाश निरगुडे, ओंकार नाईक आदी उपस्थित होते. मंडळाचे मंगेश शिंदे, उदय वाडेकर, संदीप नाकील, अक्षय चौहान, मनोज शेलार आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला. शिवजयंती उत्सवाचे यंदा ३९ वे वर्ष आहे. रथावरील शिव प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी शंखनाद पथक, विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडा मधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जयनाथ मित्र मंडळ धनकवडी मधील ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. अग्रभागी असलेल्या रथावर ऐतिहासिक नाटक सादर करण्यात आले. किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, समाजाच्या प्रत्येक घटकाने त्यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, महिलांकरीता विविध स्पर्धा असे उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *