पूर्व भागातील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीगुरूवार पेठेतील प्रभात जनप्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याला ओळखले जाते. विद्येच्या या माहेरघरामध्ये कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने व सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने शहराच्या पूर्व भागातील तब्बल २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला एक महापुरूषाची प्रतिमा देखील देण्यात आली. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांसमोर महापुरूषांचा आदर्श निर्माण व्हावा, म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने व सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने पुण्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याची मदत कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाहट्टी चौकातील नाकोडा भैरव जैन धर्मशाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव, सेवा सहयोग संस्थेचे पुणे प्रतिनीधी विजय जोशी, प्रभात जनप्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, अमोल थोरात, उदय वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपास पेटी व महापुरूषाची प्रतिमा देण्यात आली.
विजय जोशी म्हणाले, शिक्षण घेत असताना मुलांनी अभ्यासाबरोबर मैदानावर देखील जायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक किल्ले आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. तसेच या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांबरोर अनेक मावळे लढले त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वतःचा सर्वांगीण विकास देखील केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, दरवर्षी प्रभात जनप्रतिष्ठानच्यावतीने पूर्व भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. परंतु विद्यार्थ्यांसमोर शालेय जीवनातच चांगले आदर्श निर्माण व्हावेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एका महारूषाची प्रतिमा दिली आहे. यामुळे मुले त्यांची माहिती स्वतःहून मिळविण्याचा प्रयत्न करतील व विद्यार्थ्यांना महापुरूषांची ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, गौरव मळेकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने व सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने पुण्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याची मदत कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाहट्टी चौकातील नाकोडा भैरव जैन धर्मशाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.