पुस्तकांमधून समाज घडतो ; व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.
पुस्तके ही केवळ पाने नसून, त्याद्वारे आपली वैचारिक जडणघडण होते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व आणि समजाची निर्मिती होते. आपण केवळ एक व्यक्ती नसून, या समाजाचा भाग आहे, अशी वैचारिक परिपक्वता पुस्तकांमधून येते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. देशाच्या तिजोरीत ज्याप्रमाणे पैसे महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणे साहित्याचा खजिना किती आहे, हेही महत्त्वाचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात फडणवीस यांनी भेट देऊन, प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ट्रस्टचे संचालक युवराज मलिक, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आमदार सुनील कांबळे, श्रीकांत भारतीय, धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते महोत्सव यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुस्तक महोत्सवाच्या आयोजनासाठी पुण्यासारखे दुसरे शहर असुंच शकत नाही. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यात पुणेकरांचा हात कोणी धरू शकत नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने प्रकर्षाने ती पाहायला मिळाली. पुणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद हा अतिशय उत्तम असून, त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. एकीकडे पालक सांगतात की, मुलांचा स्क्रीन ताईमथा वाढला आहे. अशावेळी शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी पुस्तक महोत्सवाला दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी केली आहे. ही फार आशादायक बाब आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद हा खूप मोठा असून, असा प्रतिसाद यापूर्वी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला मिळालेला नाही. पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी झाल्याचे मलिक यांनी सांगितले.
राजेश पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे पुस्तक महोत्सव आयोजनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
…
राज्यातही पुस्तक महोत्सव व्हावे
…
पुस्तकांमधून आपल्याला इतिहास कळतो. आपल्या राष्ट्राच्या निर्मितीबाबत माहिती मिळते. या ज्ञानामुळे भावी पिढी घडत असते.त्यामुळे राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि राजेश पांडे यांनी मिळून असे पुस्तक महोत्सव नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा राज्यातील इतर शहरांमध्ये करावे, अशी विनंती फडणवीस यांनी केली.
….
विक्रमवीर पांडे
….
राजेश पांडे यांनी चार नव्हे, आता पर्यंत सात विक्रम केले आहेत. त्यामुळे त्यांना विक्रमवीर पांडे असे म्हणायला हरकत नाही. असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राजेश पांडे यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले.