पुण्यात ‘सनी’चे ग्रँड प्रीमिअर
‘सनी’ची सुरुवातीपासूनच जोरदार चर्चा होती आणि अखेर आता ‘सनी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज पुण्यातील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे ग्रँड प्रीमिअर एकदम जल्लोषात साजरे झाले. या वेळी फेटा बांधलेल्या ‘सनी’ची ‘प्रिन्स ऑफ पारगाव’ या त्याच्या गाडीतून दिमाखदार एन्ट्री झाली. ढोल ताशे, भव्य रांगोळी, आरतीने ‘सनी’चे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रचंड प्रेक्षकवर्ग उपस्थित असलेल्या या प्रीमिअर सोहळयात ढोल ताशाच्या तालावर ललित प्रभाकर, दिग्दर्शक हेमंत ढोमे, क्षिती जोग यांच्यासह चित्रपटातील इतर टीमनेही ठेका धरला. या ठिकाणी ‘सनी’चे म्हणजेच ललित प्रभाकरचे एक भव्य पोस्टरही उभारण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी 'सनी'चे पुण्यात दोन शो आणि ठाण्यात एक शो असा पेड प्रिव्यू शो आयोजित करण्यात आला होता. या तिन्ही शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि 'हाऊसफुल'चे बोर्ड झळकले. मराठी सिनेसृष्टीत असे पहिल्यांदाच घडले की, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता अवघ्या महाराष्ट्रातही 'सनी'ला प्रेक्षक आपलेसे करतील, यात शंका नाही.
प्रदर्शनाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” असाच ग्रँड प्रीमिअर ‘झिम्मा’चाही झाला होता. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ‘सनी’ला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद पाहाता प्रेक्षक ‘सनी’लाही तितकेच प्रेम देतील, याची खात्री आहे. इतक्या दिवसांनी ‘सनी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुण्यातील ‘सनी’चा पहिलाच शो ‘हाऊसफुल’ पाहून समाधान वाटले. मुंबई, महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही प्रेक्षकांचा असाच सकारात्मक प्रतिसाद मिळावा. हा सिनेमा धमाल आहे, भावनिक आहे, खूप काही सांगून जाणारा आहे. घराचे, नात्याचे महत्व सांगणारा ‘सनी’ आहे. घरापासून लांब असणाऱ्या प्रत्येकाची ही कहाणी आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असून तरुणाईने आवर्जून आपल्या पालकांसोबत हा सिनेमा पाहावा.”
ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शक आहेत. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’चे अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी ‘सनी’चे निर्माते असून संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत. ‘सनी’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.