Entertainment

पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला  “लोकमान्य’ मालिकेचा भव्य प्रीमियर

Share Post

झी मराठी वाहिनीचं प्रेक्षकांसोबत अतूट नातं आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधून नेहमीच मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आपण पाहत आलो आहोत. बदल घडत नाही तो घडवावा लागतो, या दिशेने सध्या झी मराठी वाहिनीचा प्रवास सुरू आहे. आणि हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं आजच्या काळाशी अगदी सुसंगत आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे, लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा. या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला.

यावेळी क्षितीश दाते, स्पृहा जोशी, नील देशपांडे, मैथिली पटवर्धन, मालिकेचे निर्माते दशमी क्रिएशन्स चे नितीन वैद्य, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक,  शैलेश टिळक, कुणाल टिळक,  पोलिस उपायुक्त संदीप सिंग, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, झी मराठीचे अमित शहा, कल्याणी पाठारे,  प्रसन्न केतकर, अरविंद गोखले, अपर्णा पाडगावकर, अभिनेते अद्वैत दादरकर यांच्यासह मालिकेतील कलाकार आणि टिळक कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी ‘लोकमान्य’ मालिकेतील कलाकारांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या  लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत.  ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना क्षितिज दाते म्हणाला, ही मालिका लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची चरित्रगाथा आहे. मी या मालिकेसाठी अभ्यास करतोय, त्यातून मला कळतंय की शाळेत जे शिकवलं गेलं आणि त्यानंतर वाचलं गेलं त्याच्या फार पलीकडचा मोठा अवाका टिळकचरित्राचा आहे.  ह्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ही अशी भूमिका मी पहिल्यांदाच करत आहे. ही व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक आहे. लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला एवढंच माहित असतं की ते अतिशय कडक आणि शिस्तप्रिय होते. पण त्याशिवाय त्यांचे त्यांच्या पत्नीशी असलेलं नातं कसं होतं, विद्यार्थ्यांशी असलेलं नातं, समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या पिढीतले त्यांचे जे आदर्श होते त्यांच्याबरोबरचं त्यांचं नातं, याबद्दल मला नव्याने खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल वाचायला मिळालं. मालिकेच्या निमित्ताने पुन्हा मुळापासून वाचन झालं. ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी आहे.  “लोकमान्य” ही मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. झी मराठीवर प्रसारित होणार आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *