18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुण्यातील क्रेसेन्डो वर्ल्डवाइड आणि अमेरिकेतील मिशिगन सरकारचा सामंज्यस करार..

Share Post

ऑटोमोटिव्ह निर्यात क्षेत्राने एक नवीन विक्रम स्थापन केला असून भारत-अमेरिका उलाढाल $1.95 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये नामांकित ऑटाेमाेटिव्ह कंपन्यांना आता लागणारी उपकरणे भारतातील कंपन्यांकडून पुरवता येणे शक्य हाेणार आहे. यासाठी भारतातील लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (एमएसएमई) अमेरिकन ऑटोमोटिव्ह उद्योगांसाेबत जाेडण्यासाठी क्रेसेन्डो वर्ल्डवाइड आणि मिशिगन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमईडीसी) ने एक संयुक्त उपक्रम तयार केला आहे. क्रेसेंडाे वल्डवाईडतर्फे या परिषदेचे आयोजन पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट येथे करण्यात आले होते. यावेळी मिशिगन इकाॅनाॅमिक डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनचे वरिष्ठ एफडीआय कन्सल्टंट पॉल क्रेप्स, क्रेसेंडाे वल्डवाईड चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक विशाल जाधव, उपाध्यक्ष रूपेश पाटील, ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अनेक दिग्ग्ज मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत ऑटोमोटिव्ह उद्योगातील कंपन्या या आपली आर्थिक प्रगती करण्याबराेबरच अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी एकत्र आल्या हाेत्या. ऑटोमोटिव्ह क्षेत्राबाबत चर्चा घडवणे, कंपन्यांना भागीदारी करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा या परिषदेचा उद्देश हाेता.यानिमित्ताने मिशिगनमधील डेट्रॉईट आणि पुणे ही जगातील दोन प्रमुख ऑटोमोटिव्ह शहरे व्यापार आणि गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आली.

फोर्ड, शेवरलेट, स्टेलांटिस, जनरल मोटर्स, क्रिस्लर, टेस्ला सारख्या मोठ्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी भारतीय ऑटोमोटिव्ह पार्ट्स उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या आहेत. या कार्यक्रमामुळे निर्यातीच्या संधी खुल्या होतील. निर्यातीच्या संधी प्रामुख्याने शीट सारख्या ऑटोमोटिव्ह पार्ट्सचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना असतील. तसेच धातू, एक्झॉस्ट सिस्टम, चेसिस, कास्टिंग आणि फोर्जिंग्ज, डिझाइन इंजिनिअरिंग, फास्टनर्स, स्टीयरिंग पार्ट्स, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, गियर्स आणि गिअरबॉक्सेस, सस्पेंशन, ब्रेक सिस्टम्स प्लास्टिक आणि रबर, वाहन सॉफ्टवेअर, आयटी आणि आयओटी उपकरणे इ. पुरवता येउ शकतात.

अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी सुमारे 13.5 लाख वाहने विकली गेली. ज्यात 2.8 लाख कार, 7.5 लाख युटिलिटी वाहने, 2.5 लाख पिकअप आणि 0.5 लाख व्हॅन-मिनिव्हन्स आहेत. यूएसए मध्ये 3 लाख 20 हजार अवजड ट्रक, 4 लाख 41 हजार टू-व्हीलरचे उत्पादन केले जाते. सन २०२२ मध्ये तेथे 7 लाख 50 हजार इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. ‘चायना-प्लस-वन’ धोरण मोठ्या जागतिक कंपन्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. भारतासाठी, विशेषतः ऑटोमोटिव्ह घटक उद्योगात फायदेशीर ठरण्याची क्षमता आहे.

विशाल जाधव म्हणाले की, “भारत येत्या 5 वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि युएससाठी मुख्य व्यापार भागीदार बनेल. पंतप्रधान मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संबंध आपल्याला नक्कीच पुढच्या स्तरावर घेऊन जातील. या उपक्रमामुळे विकास, नावीन्य आणि सहकार्यासाठी विविध संधी निर्माण होतील ज्याचा फायदा एमईडीसी आणि भारतीय ऑटोमोटिव्ह कंपन्यांना होईल.”

रूपेश पाटील म्हणाले की, “एमईडीसी ही यूएस ऑटोमोटिव्ह बाजारपेठ शोधण्यात स्वारस्य असलेल्या आणि एमईडीसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय ऑटोमोटिव्ह कंपन्यांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देते.

पुण्यातील क्रेसेंडाे वल्डवाईड ही भारतातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय व्यापार आणि थेट परकीय गुंतवणूक सहाय्यक संस्था आहे. या संस्थेने एमईडीसी मध्ये विस्तार करण्यास इच्छुक असलेल्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील १०० हून अधिक भारतीय कंपन्यांची ओळख करून दिली आहे. मिशिगनला धोरणात्मक स्थान मानून कॅनडा आणि मेक्सिकोला पुन्हा निर्यात करण्याचेही या कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. तर मिशिगन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमईडीसी) हे मिशिगन राज्य आणि स्थानिक पातळीवर सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणून काम करते. याचे ध्येय हे स्मार्ट व आर्थिक विकासाला चालना देणे, मिशिगन व्यवसाय आणि समुदायाला समर्थन देणे हे आहे.