पुणे विद्यापीठाच्या व्यंगचित्रकला संग्रहालयाचा पहिला वर्धापन दिन साजरा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयाने २५ मार्च (शनिवार) रोजी पहिला वर्धापन दिन साजरा केला. या सोहळ्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रख्यात व्यंगचित्रकार चारुहास पंडित, घनश्याम देशमुख, वैजनाथ दुलंगे, धनराज गरड,अतुल पुरंदरे, विश्वास सुर्यवंशी,शरयू फरकंडे, चैतन्य गोवंडे, शौनक संवत्सर आणि मैथिली पाटणकर यांचा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनावणे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध व्यंगचित्रकार सूरज ‘एस्के’ श्रीराम यांनी संग्रहालयाच्या उभारणीच्या प्रवासाविषयी सांगितले. त्यांनी सर्व व्यंगचित्रकारांना संग्रहालयाच्या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी गेल्या एक वर्षात संग्रहालयाने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संग्रहालयाने वर्षभरात नियमित संग्रहालय भेट कार्यक्रम केले यासोबतच लहान मुलांच्या कार्यशाळा, व्यंगचित्र स्पर्धा, लाईव्ह कॅरिकेचर, व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम आयोजित केले होते. प्रा.माधवी रेड्डी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. वार्षिक कार्यक्रमानिमित्त संग्रहालय परिसरात व्यंगचित्रकार आणि रेखाचित्रकारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारतातील विविध कलाकारांनी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन केले होते.
“विद्यापीठ व्यंगचित्रकला विषयी अभ्यासक्रम सुरु करण्याचा नक्कीच विचार करेल. या अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ तसेच प्रमुख व्यंगचित्रकारांसह लवकरच एक अभ्यास मंडळ लवकरच तयार केले जाईल.”- डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ