20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची चर्चा

Share Post

राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे आगामी काळात होणाऱ्या पुणे लोकसभेसाठी मराठा समाजाच्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता बळावली आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे हे तीन मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केला आहे. त्यामुळे हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का? यावर आता वेगवेगळी मते मांडली जात आहेत.

मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचेही गणितही पुढे आले आहे. कोथरूडचे विद्यामान आमदार असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री आहेत. त्यात आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यापण आता खासदार होणार आहेत. याच मतदारसंघात भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष दिले होते. ही सर्व गणितं बघता आता मुळीक यांना खासदारकीची उमेदवारी मिळेल याची शक्यता बळावली आहे.