NEWS

पुणे लोकसभा उमेदवारीच्या यादीत मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?

Share Post

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना पुण्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार? यापेक्षा भाजपची (BJP) उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबतच्या शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत. त्यासाठी प्रत्येकजण आपापले आडाखे, अंदाज बांधत आहेत. माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने उमेदवारीची गणिते सोपी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) इच्छुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत चर्चा आणि अंदाज बांधला जात आहे.

पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेले माजी महापौर आणि विद्यमान सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) या दोघांमध्येच खरेतर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) हेही या स्पर्धेमध्ये आहे.

मोहोळ यांनी गेल्या वर्षभर संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतानाच स्वत: पैलवान असल्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करून पुणे शहराचे नाव राज्यभर नेले. तर दुसरीकडे मुळीक यांनीही कार्यक्रमांचे आयोजन करून नाव चर्चेत ठेवले आहे. सुनील देवधर शहराला अनोळखी असलेला त्यांचा चेहरा पोहचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेतले. आता पक्षांतर्गत लोकसभा उमेदवारीच्या या आखाड्यात मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक की सुनील देवधर यांच्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते आहे.

दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी या काळात विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष आणि अडीच वर्षे महापौरपद भूषविले आहे. तसेच पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर वॉर्ड अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीस अशी जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहेत. या सर्व काळातील त्यांची कारकीर्द ही त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत आणि जनसंपर्क या तिन्ही पातळीवर अधोरेखित करणारी ठरली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मिळालेल्या पक्ष संघटनेच्या जबाबदाऱ्या आणि मिळालेली पदे या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना काळात महापौर असताना केलेलं काम याचं कौतुक झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या कामाची दाखल घेत त्यांचे कौतुक केले होते. पुणे लोकसभेतील सहाही विधानसभा मतदार संघात मोहोळ पोहोचलेले आहेत.

दुसरीकडे शहराच्या पूर्व भागातील भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनीही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी वातावरण निर्मिती केली आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत ते वडगाव शेरी या मतदार संघातून आमदार झाले. मात्र, 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

दरम्यान, राज्यसभेवर वर्णी लागलेल्या मेधा कुलकर्णी यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डावलून कोथरूडमधून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाज दुखावल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करतानाच ब्राह्मण समजाचीही नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच पक्ष पातळीवरचे अनेक गुंतेही सोडविल्याचे बोलले जात आहे. सामाजिक समतोल राखण्यासाठी आता लोकसभेसाठी ब्राम्हणेतर उमेदवार भाजप देईल अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे मोहोळ आणि मुळीक यांच्यामध्ये लोकसभा उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *