18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुणेकरांना हवा असा खासदार

Share Post

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही दिवसांचा अवधि शिल्लक असताना पुण्यामध्ये भाजपचा आणि महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळात आणि सार्वजनिक ठिकाणीही चर्चांना उधाण आलेले दिसते आहे. या चर्चा होत असताना पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिक यांच्या मतांचा कानोसा घेतला असता इच्छुकांनी आजपर्यंत काय कामे केली? याचा लेखाजोगा, एकूणच पुणे शहर लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना त्याची काम करण्याची पद्धत, राजकीय परिपक्वता, मतदार संघावर पकड असणारा नेता आणि शहरासाठी विकासाच्या दृष्टीने पुढील २५ वर्षांचे व्हीजन असलेला खासदार असावा असा सूर दिसून येत आहे. पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे आणि शिवाजी मानकर हे चार मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने ब्राह्मण उमेदवाराला संधी दिली आहे. हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का, यावर मतमतांतरे दिसून येत आहेत. कॉँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी इच्छुक आहेत.या इच्छुक उमेदवारांमध्ये विविध क्षेत्रातील पुणेकरांना वर सांगितल्याप्रमाणे अपेक्षित उमेदवार म्हणून पाहिल्यास या सर्वांमध्ये भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे सरस असल्याचे चित्र आहे. तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोहोळ यांनी विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएलचे साडेतीन वर्षे संचालक आणि अडीच वर्षे महापौर पद भूषविले आहे. मुरलीधर मोहोळ हे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष ही होते.या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवत शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आपली एक मिनी खासदार अशी प्रतिमा निर्माण केली आहे. काही उपक्रम तर अनेक वर्षांपासून ते राबवत आहेत. त्यामध्ये इयत्ता १० वी, १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान हा त्यांचा उपक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे तर भव्यदिव्य कोथरूड सांस्कृतिक महोत्सवही सलग १२ वर्षे सुरू आहे.

मोहोळ यांच्या कामाची आणि काम करण्याच्या पद्धतीची खरी ओळख झाली ती कोरोनाच्या काळात. या काळात ते महापौर होते. त्यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र, त्यातून बाहेर येत त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून अखंडपणे जनसंवाद करत पुणेकरांना धीर दिला. त्यामुळे ‘कोरोनाला हरवणारा महापौर’ ते ‘कोरोनाग्रस्तांना आधार देणारा महापौर’ अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झाली.पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी त्यांनी १९१७-१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अर्थसंकल्पामध्ये केलेली आर्थिक तरतूद, त्यासाठी तातडीने ट्रस्ट स्थापन करून राज्य सरकारची मान्यता आणि केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याला आलेले यश यामुळे पुण्यनगरीच्या मुकूटावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कर्वे रस्त्यावरील पहिला दुमजली उड्डाणपुल असेल, पुणे शहराची सार्वजनिक वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस पुणे शहरात आणल्या आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यावर पीएमपीएलमध्ये एकही डिझेलवर चालणारी बस नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करणारे सर्वात मोठे सेंटर म्हणून पुणे शहर झाले आहे. या सर्वाचे श्रेय हे मोहोळ यांनाच जाते. याशिवाय नदी सुधार प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक , २४/७ पाण्याची योजना यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पुणे शहराच्या भविष्याचा विचार करून अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले.कोरोनानंतर पुणे शहरात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आपला वाढदिवस साजरा न करता ‘रक्तदान महासंकल्पा’सारखे उपक्रम ते घेत आहेत त्या माध्यमातून १८ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्याबरोबरच आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. पुणे महानगर पालिका आवारात स्वखर्चाने शिवाजी महाराजांचा पुतळा मोहोळ यांनी बसवला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.या सर्व कार्याबरोबरच स्वत: पैलवानकी केलेल्या मोहोळ यांनी कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा भरवल्या तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले.अटल संस्कृती गौरव पुरस्कार आणि अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमिताने कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन त्यांनी केले.दुसरे इच्छुक जगदीश मुळीक यांनी पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या सर्व भागांत संपर्क केला. बागेश्वरधाम, जया किशोरी यांचे कार्यक्रम असोत की शहरात आयोजित केलेली मॅरेथॉन असो या निमित्ताने ते सतत पुणेकरांसमोर राहिले आहेत. सुनील देवधर यांनीही विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्याने कॉँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला दिली जाते हे अद्याप निश्चित नाही.वरील सर्व गोष्टींचा ऊहापोह केल्यानंतर पुण्याचा खासदार म्हणून विविध क्षेत्रातील लोकांना, मतदारांना अपेक्षित असलेला, सर्व क्षेत्रात आणि सर्व पातळ्यांवर सक्षमपणे काम करू शकणारा व मतदार संघावर पकड असणारा, पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने व्हीजन असलेल्या उमेदवारांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचेच नाव अग्रस्थानी येत आहे.