पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) कडून संशोधन कार्यासाठी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती(BANRF) देण्यात येते. त्याअनुषंगाने २०२२ मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये पीएचडी’साठी अधिकृत नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टीकडे अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) साठी अर्ज केलेले आहेत. त्यावर बार्टी कार्यालयाकडून कागदांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु राज्यातील सारथी, महाज्योती आणि टार्टी या संशोधन संस्था कोणत्याही परीक्षा आणि मुलाखती न घेता पात्र विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देतात. असे असताना बार्टी तसे न करता परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त २०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा घाट घालते आहे.अनुसूचित जातीतील विद्यार्थी संशोधनाच्या माध्यमातून राज्याला आणि देशाला शिक्षण क्रांतीचे वळण देवू इच्छित आहेत. संशोधनासाठी संशोधकांना अर्थसहाय्याची गरज असते.याचपार्श्वभूमीवर २०२२ च्या पात्र विद्यार्थ्यांनीबार्टी प्रशासन तसेच राज्यातील आमदार खासदार यांचेकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत.त्यावर बार्टी प्रशासनाने दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांच्या सरसकट अधिछात्रवृत्तीच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.त्यामुळे २०२२ चे अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थी येत्या बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ पासून बार्टी कार्यालय क्वीन्स गार्डन पुणे समोर आमरण उपोषण करणार आहेत.या लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती २०२२ महाराष्ट्र राज्य कडून देण्यात आली