पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
जय गणेश पालकत्व योजनेचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी जर दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात दिला नसता तर मी पोलीस न होता गुन्हेगारी क्षेत्राकडे नक्कीच वळलो असतो. माझी परिस्थिती बेताची होती त्यामुळे पुढे शिक्षण घेता येईल की नाही असा प्रश्न असताना ट्रस्टने मला चांगले शिक्षण देत माणूस म्हणून घडविण्यास मदत केली, अशी भावना जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत विद्यार्थी असलेल्या आणि आता भोसरी एमआयडीसी येथे पोलीस म्हणून कार्यरत अनिकेत कांबळे याने व्यक्त केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, डॉ.अ.ल. देशमुख, डॉ. संजीव डोळे, इंद्रजीत रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सचिन आखाडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी योजनेतील इयत्ता १० वी चे ११, इयत्ता १२ वी १६ आणि कोंढवा बालसंगोपन केंद्रातील ५ यशस्वी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.