पहिला पश्चिम बंगाल लघुपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी
नवोदित कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या पश्चिम बंगाल लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रोटरी सदन येथे 20 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता मिसेस इंडिया डिवाइन देबश्री चक्रवर्ती आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील सत्तरहून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत. हा लघुपट महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे. या महोत्सवासाठी पश्चिम बंगालमधीलही अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
महोत्सवासाठी विविध देशातून शंभरहून अधिक लघुपट निर्माते तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांनी सहभाग नोंदविला होता. या लघुपटांपैकी 70 हून अधिक अधिक लघुपट हे महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी निवडण्यात आले आहेत. या लघुपटांचे महोत्सवामध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहे. लघुपटांच्या प्रदर्शनानंतर विविध विभागामध्ये 35 पारितोषिके देण्यात येणार आहेत.