पहिलं वहिलं मराठी आफ्रिकन गाणं!
प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘सनी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच या चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो !’ हे धमाल गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. घराचा कायापालट होत असतानाच मैत्रीही बहरवणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं असून सौमिल – सिद्धार्थ यांचं संगीत लाभलं आहे. सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं हे गाणं सनी, संतोष आणि डिकॅम्बे म्हणजेच ललित प्रभाकर, अभिषेक देशमुख आणि पाऊलो यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
सुरुवातीला गोंधळलेल्या, नाराज असणाऱ्या ‘सनी’ची हळूहळू डिकॅम्बेबरोबर मैत्री होत आहे. सनी, संतोष आणि डिकॅम्बे यांनी एकत्र येऊन घराचा मेकओव्हर केला असून त्या घराला एक घरपण आणल्याचं दिसतंय. दोन विभिन्न स्वभाव हळूहळू एकत्र येऊन धमाल करत आहेत. एकंदरच या ढोल ताशाशी ही गिटार कशी जुळतेय, हे या गाण्यात दिसत आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” या गाण्यातून कथा पुढे जात आहे. काहीसा डिकॅम्बेसोबत जुळवून घेताना अवघडलेल्या ‘सनी’चे हळूहळू त्याच्यासोबत सूर जुळताना दिसत आहेत. तिघांची मैत्री घट्ट होतानाची प्रक्रिया यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट कुटुंबिक आहे, तरुणाईला आवडणारा आहे. त्यामुळे गाणीही प्रत्येक सीनला साजेशी आणि श्रोत्यांना आवडतील, अशीच देण्याचा आमचा प्रयत्न होता. आतापर्यंत आलेल्या गाण्यांना श्रोत्यांनी पसंती दर्शवली आता हे भन्नाट गाणंही संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”
ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तर हेमंत ढोमे यांचं दिग्दर्शन आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी ‘सनी’चे निर्माते असून संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत. येत्या १८ नोव्हेंबर ‘सनी’ प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.