पश्चिम बंगाल लघुपट महोत्सवात सेल्फी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पश्चिम बंगाल लघुपट महोत्सवात आयन आचार्य दिग्दर्शित सेल्फी हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर याच लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी आयान आचार्य यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील रोटरी सदन येथे 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण मिसेस इंडिया डिवाइन देबश्री चक्रवर्ती आणि ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. भारतासह विविध देशातील लघुपट निर्माते आणि दिग्दर्शक या महोत्सवांमध्ये सहभागी झाले होते यापैकी 35 सर्वोत्कृष्ट लघुपटांना पारितोषिके देण्यात आले.
चेन्नई येथील वीरेन वायापुरी यांच्या असावा या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून पारितोषिक देण्यात आले. जर्मनी येथील ब्रेकिंग फ्री या लघुपटाला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक, आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलकत्ता येथील ए एफ एक्स ॲनिमेशन या संस्थेच्या झिरो या लघुपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पट म्हणून पारितोषिक देण्यात आले. तर श्रीमन दास यांच्या कन्क्लूजन या लघुपटासाठी त्यांना ॲनिमेशन विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पारितोषिक मिळाले. तर राक्षससासुर या लघुपटाला ॲनिमेशन विभागातील सर्वोत्कृष्ट पटकथा हे पारितोषिक देण्यात आले.
आयान आचार्य यांच्या आहारी या लघुपटाला बेस्ट ऑफ बेंगॉल पारितोषिक देण्यात आले. दिग्दर्शक नेहा शर्मा यांच्या स्टोरी ऑफ शाखा या लघुपाटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून गौरविण्यात आले. आसाम मधील मेहक माथुर या दिग्दर्शिकेला महोत्सवातील सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले तर या दिग्दर्शिकेच्या यू वॉन्ट कंपनी या लघुपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट म्हणून पारितोषिक देण्यात आले. भारतासह विविध देशातून आलेल्या लघुपटान पैकी सर्वोत्कृष्ट 50 पेक्षा अधिक लघुपटांचे या महोत्सवांमध्ये प्रदर्शन करण्यात आले.