Sports

पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले !!

Share Post

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेत महेश मांजरेकर यांच्या पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने प्रविण तरडे यांच्या रायगड पँथर्स संघाचा १९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, स्वारगेट येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकामध्ये १११ धावांचे आव्हान उभे केले. जय दुधाणे (४८ धावा) आणि सिद्धांत मुळे (नाबाद ४८ धावा) यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ४२ चेंडूत ८१ धावांची भागिदारी करत संघाच्या डावाला आकार दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना रायगड पँथर्स संघाचा डाव ९२ धावांवर मर्यादित राहीला. अजिंक्य जाधव (२८ धावा) आणि गौरव देशमुख (२४ धावा) व देवेंद्र गायकवाड (१४ धावा) यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना महत्वपूर्ण खेळी केल्या पण, संघाचा विजय १९ धावांनी दूर राहीला व महेश मांजरेकर यांच्या पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आर. एम. धारीवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल-बालन आणि पुनित बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले. ‘जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटातील प्रमुख भुमिका असलेले अमेय वाघ आणि वैदही परशुरामही यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी प्रतापगड टायगर्सचा कर्णधार शरद केळकर, सिंहगड स्ट्रायकर्सचा कर्णधार सिद्धार्थ जाधव, शिवनेरी रॉयल्स्चा कर्णधार संदीप जुवाटकर, उपेंद्र लिमये, महेश लिमये, संजय नार्वेकर, संजय जाधव असे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल मल्होत्रा आणि अभय जाजू यांनी केले.

स्पर्धेतील विजेत्या पन्हाळा जॅग्वॉर्स संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या रायगड पँथर्स संघाला ५१ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज हा मान जय दुधाणे (पन्हाळा जॅग्वॉर्स, २९८ धावा) याला देण्यात आला. जय दुधाणे याला २१ हजार रूपये आणि इलेक्ट्रीकल बाईक देण्यात आली. सर्वोत्कृष्ट गोलंदाज विवेक गोरे (प्रतापगड टायगर्स, ७ विकेट) आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हृषीकेश जोशी (प्रतापगड टायगर्स) यांना करंडक व ११,१११ रूपये (प्रत्येकी) देण्यात आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिमः
पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ३ गडी बाद १११ धावा (जय दुधाणे ४८ (२८, ६ चौकार), सिद्धांत मुळे नाबाद ४८ (२५, ५ चौकार), ऋतुराज फडके २-२०);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी जय आणि सिद्धांत यांच्यात ८१ धावा (४२ चेंडू) वि.वि. रायगड पँथर्सः १० षटकात ६ गडी बाद ९२ धावा (अजिंक्य जाधव २८ (२२, २ चौकार, १ षटकार), गौरव देशमुख २४ (२१, १ चौकार), देवेंद्र गायकवाड १४, शुंभाकर एकबोटे १-१४); सामनावीरः सिद्धांत मुळे;

उपांत्य फेरीः
तोरणा लायन्स्ः १० षटकात ४ गडी बाद ८२ धावा (संजय जाधव २६, शिखर ठाकूर २५, अजिंक्य जाधव २-१९, ऋतुराज फडके १-१०) पराभूत वि. रायगड पँथर्सः ७.१ षटकात २ गडी बाद ८३ धावा (गौरव देशमुख नाबाद ३६ (२३, ३ चौकार, १ षटकार), अजिंक्य जाधव नाबाद ३० (१९, ३ चौकार, १ षटकार); सामनावीरः अजिंक्य जाधव;

पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात २ गडी बाद १०८ धावा (जय दुधाणे नाबाद ७४ (३२, ३ चौकार, ५ षटकार), सिद्धांत मुळे १२) वि.वि. सिंहगड स्ट्रायकर्सः १० षटकात ४ गडी बाद १०४ धावा (सिद्धार्थ जाधव ४६ (३०, ६ चौकार), तेजस देवोसकर ३२, सिद्धांत मुळे १-१९, अक्षय वाघमारे १-१६); सामनावीरः जय दुधाणे;

स्पर्धेतील पारितोषिक विजेतेः
विजेता संघः पन्हाळा जॅग्वॉर्स- १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक;
उपविजेता संघः रायगड पँथर्स- ५१ हजार रूपये आणि करंडक;
मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू- जय दुधाणे- २१ हजार रूपये आणि इलेक्ट्रीकल बाईक;
सर्वोत्कृष्ट फलंदाज- जय दुधाणे (पन्हाळा जॅग्वॉर्स, २९८ धावा); करंडक व ११,१११ रूपये;
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- विवेक गोरे (प्रतापगड टायगर्स, ७ विकेट); करंडक व ११,१११ रूपये;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- हृषीकेश जोशी (प्रतापगड टायगर्स); करंडक व ११,१११ रूपये;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *