पथनाटयातून समाजातील ज्वलंत समस्यांवर प्रकाश
राजकारण, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, भौतिक विकासाची गती अशा समाजातील ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत तरुणाईने पथनाटय सादर केले. पथनाटय, वादविवाद, भारुड/पोवाडा/भजन या प्रकारांत ५०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि १ हजार २०० हून अधिक विद्यार्थी वत्कृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने ५ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात आयोजित स्पर्धेचे उद््घाटन शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेत तब्बल २६ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

उद््घाटनानंतर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विश्वगुरु छत्रपती शिवाजी महाराज, बदललेले शैक्षणिक धोरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशी तैशी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे (साने गुरुजी) याविषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर, वादविवाद स्पर्धेकरीता दिशाहिन राजकारणात युवकांना स्थान आहे की नाही? हा विषय देण्यात आला होता. त्यावर देखील विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणा-या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी घेतला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे.
