NEWS

पत्रकारांनी ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूज पेक्षा सत्यनिष्ठतेवर भर द्यावा

Share Post

“समाजाच्या, देशाच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांना सत्याचा आरसा दाखवण्याचे दायित्व माध्यमांवर आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूजमध्ये न अडकता पत्रकारांनी सत्यनिष्ठतेवर, दुसऱ्यांच्या वेदना कमी करणारी पत्रकारिता करण्यावर भर द्यावा. त्यातूनच समाजात आणि माध्यमांत संवाद, सर्वसमावेशकता आणि शांततेची संस्कृती रुजेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सत्य प्रकाश नायक यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्वराज बागेतील जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप त्यांच्या मार्गदर्शनाने झाला. आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने ही परिषद भरविण्यात आली होती.

यावेळी माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशनचे कुलगुरू प्रा. के. जी. सुरेश, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक प्रियंकार उपाध्याय, डीडी न्यूजच्या वरिष्ठ निवेदिका रीमा पराशर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे संचालक धीरज सिंह, दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, ‘मिटसॉग’चे संचालक डॉ. के. गिरीसन, विद्यार्थी प्रतिनिधी रुपम उत्तम उपस्थित होते.

सत्य प्रकाश नायक म्हणाले, “पत्रकारांनी आपला आवाज क्षीण होऊ देता कामा नये. ‘जटायू’ पक्षाने रावणा विरोधात जसा लढा दिला, त्याप्रमाणे पत्रकारांनी समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. देशात गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत. या प्रश्नांना वाचा फोडली, तर समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल.”

प्रा. के. जी. सुरेश म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पत्रकारिता करण्याची सवय मागे पडत आहे. वातानुकूलित खोलीत बसून, डेस्क स्टोरी करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारिता ही सध्याची गरज आहे. देशाचा विकास व समाजातील सकारात्मकता हीच खरी पत्रकारिता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली पाहिजे.”

रीमा पराशर म्हणाल्या, “शांतता कंटाळवाणी नाही, तर आनंददायक आहे, हे समजून घ्यायला हवे. गोंधळ घालणारी, रंजक पत्रकारिता समाजाच्या हिताची नाही. त्यातून विश्वसनीयता कमी होत आहे. सोशल मीडियामुळे लोकांमध्येही जागरूकता वाढत आहे. त्यामुळे बातमीची शहानिशा करून प्रसिद्ध करायला हवी. विद्यार्थ्यांनी ग्लॅमरच्या मागील मेहनत समजून घ्यावी.”

प्रा. प्रियंकार उपाध्याय म्हणाले, “समाज परिवर्तनात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, सोशल मीडियाच्या प्रभावाने पत्रकारितेचा मूळ गाभा हरवत चालला आहे. वाईट बातम्यांना टीआरपी अधिक मिळत असल्याने चांगल्या बातम्या दुर्लक्षित होतात. डिजिटल मीडियातून द्वेष भावना पसरणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी. मानवी हक्क आणि लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्याचे दायित्व पत्रकारांवर आहे. त्यासाठी समाजात माध्यम साक्षरतेचे महत्व रुजावे.”

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी उपस्थितांना ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी ‘एमआयटी’च्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत माध्यमांच्या विविध पैलूंवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. के. गिरीसन यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. धीरज सिंग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *