पत्रकारांकडून लोकशाहीला बळकटी देण्याचे काम – तापकीर
पुरस्काराने माणसांवर मोठी जबाबदारी येते. पत्रकार नेहमीच लोकशाहीला बळकटी देण्याचे काम करतात, असे मत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त व प पू चंदनबालाजी म. सा व प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दैनिक पुढारीचे रवी कोपनर, दैनिक पुण्यनगरीचे गणेश वाघमोडे, व्यंगचित्रकार धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला. जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले. तसेच, अंध अपंगांसाठी अन्नदान व अन्नधान्य किटचे वाटपही करण्यात आले.
ताकीर म्हणाले, ‘लेखणीच्या माध्यमातून परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करतात. विरोधात बातमी लागली म्हणून कोणी त्यांच्यावर नाराज होऊ न होता उलट ते लिहितात त्या गोष्टींकडे आपण संवेदनशीलपणे पाहून ते प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवे. कार्यक्रमास दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, मा. नगरसेवक युवराज बेलदरे, प्रविण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देविदास जाधव आदी उपस्थित होते.
आवटे म्हणाले, ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. हे तत्वज्ञान आपण विसरत असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचा आनंद आहे. धर्म म्हणजे धारणा, परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्वाचे आहे. ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांच्या भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे असून आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक असताना पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करणे ही बाब मोठी आहे.महाप्रसादीचा लाभ बन्सीलाल,अनिल, मनोज,ओस्तवाल परिवाराने घेतला.स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. सूत्रसंचालन महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.