20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पंचधातूंपासून ‘तष्ट’ने साकारलेले ‘शिववस्त्र’ पोहोचणार सातासमुद्रापार

Share Post

अनेक पुरातन पुस्तकात तसेच दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पाहायला मिळते. छत्रपतींचे नाव, त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव पाहिला की प्रत्येक शिवप्रेमींचा उर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा, ऊर्जा  प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून ‘तष्ट’ आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूंपासून ‘शिववस्त्र’ साकारण्यात आले आहे. हे ‘शिवस्त्र’ लवकरच सातासमुद्रापार  इंग्लंड मध्ये प्रदर्शनासाठी जाणार असल्याची माहिती ‘तष्ट’चे संचालक दीपक माने व क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार  यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला दीपक माने, रविंद्र पवार,सत्यजित जोगलेकर,अभिनंदन देशमुख़,पूनम ब्राम्हे,तन्वी खरोटे,अभिनेत्री पलक गंगेले आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘तष्ट’ परिवार आजवर महाराष्ट्रीयन संस्कृती साता समुद्रापार नेण्यासाठी झटत आला आहे. हे ऐतिहासिक शिववस्त्र साकारून ‘तष्ट’ परिवाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहण्यात आली आहे. शिवाजी महारांजाकडून मिळणारी ऊर्जा त्यांच्या पेहरावातूनही भविष्यात पुढच्या पिढीला मिळत राहो म्हणून या पेहरावाला लोकार्पण करून जतन करून ठेवण्याचा मानस ‘तष्ट’चा आहे. इंग्लंड मध्ये नोव्हेंबर महिन्यात एका खास प्रदर्शनात हे ‘शिववस्त्र’ तेथील नागरिकांना पाहता येणार आहे. 

या विषयी माहिती देताना ‘तष्ट’चे संचालक दीपक माने म्हणाले, “शिववस्त्र” हा कोणता साधारण पेहराव नाही. पुरातन पुस्तकात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच चित्रात हा पेहराव आपल्याला दिसतो. हा पोशाख प्रथम प्रत्यक्ष घडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या पोशाखाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सोने, चांदी, तांबे यांसारख्या ‘पंचधातूंचा’ वापर करण्यात आला आहे. हे पंचधातू लोकांनी स्वखुशीने तष्टकडे सुपूर्त केले. त्यानंतर मशीनवर्क आणि हँड वर्क यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आला. यासाठी कारागीर, एंब्रॉडरी कारागीर, टेलर आणि डीजायनर मिळून ३५ जणांच्या टीमने ६ महीन्यात हा पोशाख तयार केला आहे.

या विषयी अधिक माहिती ‘तष्ट’चे क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार म्हणाले, “इतिहासाची पहिल्यापासूनच मला आवड होती. त्यामुळे अशा प्रकारचे एक संग्रहालय करायचे हे माझ्या मनात आधीपासूनच होते. आम्ही कापड उद्योगात असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोणीही न पाहिलेले पोशाख आपण बनवू शकतो, हे सुचलं. त्यानंतर महाराजांचे दुर्मिळ फोटो शोधले. त्यातून महारांजांचे पोशाख निवडण्यात आले. त्याचा इतिहासात उल्लेख शोधण्याचा प्रयत्न केला. अन् त्यानंतर महाराजांचा पोशाख बनवण्याचे ठरले. आम्ही कोठे ही दावा करत नाही की हे कोणत्या घराण्याचे किंवा कोण्या एका काळातील ‘ शिववस्त्र’ आहे. मात्र हे पाहून कोणा समोर महाराजांचे चित्र उभे राहिले तर आमच्या कामाचे सार्थक झाले असे आम्हाला वाटेल.