नशामुक्त भारताकरिता १५ हजार किमी यात्रेचे पुण्यामध्ये आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे स्वागत
व्यसनमुक्त युवा, व्यसनमुक्त भारताकरिता भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली काशियाना फाऊंडेशनच्या पुढाकाराने सुरु असलेल्या नशामुक्त भारत यात्रेचे पुण्यामध्ये आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. तब्बल १५ हजार किमीची ही यात्रा असून २२ राज्यांमध्ये प्रवास करणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष व मंत्रालयाच्या (व्यसनमुक्ती कार्य) सल्लागार समिती सदस्य डॉ.अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाराणसी येथील अस्सी घाट येथून २४ जानेवारी २०२३ रोजी यात्रेला प्रारंभ झाला असून ४० दिवसांची ही यात्रा पुण्यात २७ व्या दिवशी आली आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्र अशा प्रवासात मोठया प्रमाणात व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात आली आहे. डॉ.अजय दुधाणे म्हणाले, दोन चारचाकी वाहनांतून ही यात्रा सुरु असून संपूर्ण गाडीवर व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि मंत्रालयाच्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जनजागृती तसेच प्रवासात माहितीपत्रकांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. काशियाना फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित सिंह, आशिष गुप्ता, अनुप झा, भावेश शेठ, देवेश सिंह, बृजेश चौधरी, प्रविण तिवारी, आकाश देवराज, आशिष राय, आशिष कुमार हे या यात्रेत सहभागी झाले आहेत. सुमित सिंह म्हणाले, भारतातील युवक व युवती मोठया प्रमाणात व्यसनाधिनतेच्या जाळ्यात ओढले जात आहेत. युवा शक्ती ही भारताची खरी शक्ती आहे. त्यामुळे युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेदरम्यान व्यसनमुक्तीविषयी विविध प्रकारची माहिती, संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्रानंतर बंगळुरु, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, कलकत्ता, बिहार मार्गे वाराणसी येथे यात्रा समाप्त होईल.
