नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म अँड ओटीटी अवॉर्ड्स २०२३चा शानदार सोहळा संपन्न
नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म अँड ओटीटी अवॉर्ड्स २०२३चा शानदार सोहळा नुकताच ठाण्यात संपन्न झाला. फिल्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रतिभावंतांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवणारे नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी हे पहिले व्यासपीठ आहे.
या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील महेश कोठारे, प्रवीण तरडे, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, उमेश कामत, मृणाल कुलकर्णी, राहुल देशपांडे, आदिनाथ कोठारे, अनिता दाते, जितेंद्र जोशी, निखिल महाजन, गौरी नलावडे, क्रांती रेडकर, अभिजीत पानसे, विजू माने, केदार शिंदे यांच्यासह अनेक कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात कलाकार, दिग्दर्शक,चित्रपट निर्माते, संगीतकार, गीतकार, गायक अशा पडद्यावर आणि पडद्यामागे काम करणाऱ्या सगळ्यांनाच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘तमाशा लाइव्ह’साठी सोनाली कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, शंतनू रोडे यांना ‘गोष्ट एका पैठणीची’साठी सर्वोत्कृष्ट कथा, प्राजक्ता माळीला ‘रानबाजार’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अजय-अतुल यांना ‘चंद्रमुखी’साठी सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि महेश मांजरेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. ‘रानबाजार’, ‘गोष्ट एका पैठणीची, ‘अथांग’, ‘गोदावरी’, ‘चंद्रमुखी’, ‘मी वसंतराव’ आदी चित्रपट आणि वेबसीरिजना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सुहास जोशी यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तर ‘गोदावरी’चे दिग्दर्शक निखिल महाजन यांना ‘निशिकांत कामत स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
प्लॅनेट मराठीने मराठी मनोरंजनसृष्टीत बरेच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. मराठी कॉन्टेन्ट जगभरात पोहोचवण्याच्या दृष्टीने अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठीची स्थापना केली आणि मराठी इंडस्ट्रीला जगभरात महत्वपूर्ण असे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या सोहळ्याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ‘नवराष्ट्र,प्लॅनेट मराठी फिल्म अँड ओटीटी अवॉर्ड्सचा हा पहिलावहिला सोहळा आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडल्याचा आम्हाला आनंद आहे. संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीच्या अथक प्रयत्नांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय साध्य झाल्याचा आम्हाला आनंद आहे. इंडस्ट्रीतील मंडळी आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि सहभाग खरोखरच आनंददायी होता, ज्यामुळे आम्हाला आगामी काळातही नवीन उपक्रम करण्याची प्रेरणा मिळाली.”