‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न
‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील जबरदस्त गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. नुकताच ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटात तीन गाणी असून यातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या जॉनरचे आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभलेल्या ‘स्वॅगवाला रेडा’ या अफलातून गाण्याला गणेश निगडे यांचे बोल लाभले आहेत. तर ‘हलके हलके रेशमी’ या प्रेमगीताला गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी स्वरबद्ध केले आहे. एका बाजूला धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी खुलत असतानाच दुसऱ्या बाजूला आदित्य आणि ओवीचीही प्रेमकहाणी बहरत असल्याचे या गाण्यातून दिसतेय. तर मंदार चोळकर लिखित ‘श्वास कसा हा’ या गाण्याला सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी गायले आहे. या सर्व गाण्यांना सौरभ – दुर्गेश यांचे संगीत लाभले आहे. तर या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार, सिद्धेश दळवी यांनी केले आहे. चित्रपटातील गाण्यांबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ” प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. काही भावना व्यक्त करत आहे. आमची म्युझिक टीम एकदम झक्कास असल्याने प्रत्येक गाण्याची खासियत आहे. उडत्या चालीचे, शांत, रोमँटिक असा सगळ्याच पद्धतीचा यात समावेश आहे. ‘स्वॅगवाला रेडा’ हे गाणे पाहायला जितके गंमतीशीर वाटते, तितकेच ते ऐकायलाही मजा येते. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या गाण्यांनाही देतील.” रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या लघुकथे वर प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १६ डिसेंबरपासून धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.