29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

धोंडी-चंप्याला लगीनघाई !

Share Post

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील आणि निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यात आता या नवीन मोशन पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. यात धोंडी आणि चंप्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत असून ते लग्नासाठी आतुर असल्याचे दिसतेय. या पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी सिनेमा असल्याचे कळतेय. थोडीशी हटके कथा असणाऱ्या या चित्रपटातील धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, “हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट असून धोंडी चंप्याची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. हळूहळू यातील एकेक गोष्टी समोर येतीलच. “

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी धोंडी-चंप्याची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.