20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ९७८१ वारक-यांची नेत्र व आरोग्य तपासणी

Share Post

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे पुण्यात आलेल्या वारक-यांच्या डोळ्यांची व आरोग्य तपासणी करण्यात आली. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित शिबीरात ९७८१ वारक-यांनी सहभाग घेतला. जय गणेश प्रांगण, काका हलवाईसमोर बुधवार पेठ येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबीर उद््घाटनप्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, विजय चव्हाण, सौरभ रायकर, गजानन धावडे यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रविण पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय तज्ञांचा सन्मान करण्यात आला.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात वारक-यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, चष्मेवाटप यांसह वारक-यांना प्रवासा दरम्यान येणा-या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर औषधे देखील देण्यात आली. तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया देखील करुन देण्यात येणार आहे. शिबिरात डॉ. फाल्गुनी जपे, डॉ.चित्रा सांबरे, डॉ.वैशाली ओक या डॉक्टरांसह ५० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, सत्यसाई सेवा आॅर्गनायझेशन, ससून सर्वोपचार रुग्णालय, लायन्स क्लब आॅफ कात्रज, रेणूका नेत्रालय, तेजोमयी आय केअर, फॅमिली फिजिशियन असोसिएशन पिंपरी चिंचवड, संचेती हॉस्पिटल, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ आदी संस्थांनी सहभाग घेतला. यापुढेही ट्रस्टतर्फे विविध मोफत आरोग्य शिबीरे घेण्यात येणार असून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सकाळी १५ हजार वारक-यांना पोहे, शिरा, लाडू, चहा व पाणी असा नाश्ता देण्यात आला. तसेच पुण्यामध्ये पालख्यांचे आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वारक-यांकरिता विनामूल्य नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. जय गणेश प्रांगण, काका हलवाईसमोर बुधवार पेठ येथे झालेल्या शिबीरात सहभागी वारकरी.