Entertainment

‘त्या’ वाड्यातील रहस्य आता उलगडणार !

Share Post

भयावह वाडा… वाड्याबाहेर तुळशी वृंदावन… झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या… आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत…. विचारात पडलात ना, हा कोणता देखावा? तर हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. हा दिमाखदार सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी निर्माती तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासोबत गप्पांची मैफलही रंगवली. यानिमित्ताने राज ठाकरे यांचे कलाप्रेमही उपस्थितींना जाणून घेता आले.

या वेळी राज ठाकरे आपल्या कलाप्रेमाबद्दल म्हणाले, “मी राजकारणात अपघातानेच आलो. माझा खरा कल कला क्षेत्राकडेच होता. मुळात मी चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे मी वेबसीरिज फार कमीच बघतो. परंतु ‘अथांग’ मी नक्कीच बघणार. जुना काळ पडद्यावर दाखवणे, तसे आव्हानात्मक आहे. मात्र हे आव्हान तुम्ही स्विकारुन उत्तम कलाकृती सादर केली आहे.’’

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ” या वेबसीरिजच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. कलाकार ते निर्माती हा प्रवास खूपच रंजक होता. कलाकार म्हणून वावरताना फारशी जबाबदारी नसते परंतु निर्माती म्हणून काम करताना कागदावर श्रीगणेशा लिहिण्यापासून ते अगदी आपले काम प्रदर्शित होईपर्यंत किंबहुना त्यानंतरही जबाबदारी असते. मी अक्षय बर्दापूरकर यांची आभारी आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. निर्माती होणे माझ्यासाठी स्वप्न होते आणि ते आज ‘अथांग’च्या निमित्ताने पूर्ण होतेय.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आज प्लॅनेट मराठीच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आशय देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. ‘अथांग’ ही वेबसीरिज त्यापैकीच एक आहे.’’

ट्रेलरमध्ये निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरच्या शेवटी एक लहान मुलगा, ”आई अळवत म्हणजे काय?” असा प्रश्न विचारतो. आता सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे ‘अथांग’ पाहिल्यावरच उलगडेल. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर हे निर्माते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *