17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

तेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’

Share Post

साहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे आणि ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. ‘अथांग’मध्ये तेजस्विनीने केतकी नारायणसाठी बॅाडी डबल म्हणून काम केले आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजची तेजस्विनी निर्माती आहे. पडद्यावर जरी तेजस्विनी प्रत्यक्ष झळकली नसली तरी पडद्यामागे मात्र तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या वेबसीरिजमधील काही दृश्यांना तिचा आवाजही लाभला आहे. याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘’ एक कलाकार म्हणून वावरताना आपल्यावर फार जबाबदारी नसते. शुटिंग, डबिंग करायचे की आपले काम झाले. परंतु निर्माती म्हणून वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून मी यात सहभागी होते आणि मी हे काम एन्जॅायही केले. अनेकांनी मला विचारले यात तू एखादी भूमिका का नाही केलीस, तर निर्माती म्हणून या भूमिकेला मला शंभर टक्के न्याय द्यायचा होता आणि अभिनय करून मला हे शक्य झाले नसते. मुळात यात मी पडद्यावर जरी दिसत नसले तरी पडद्यामागे मी अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. यात काही ठिकाणी मी आवाजही दिला आहे. त्यामुळे विविध भागांत मी काम केले आहे.’’ प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप,भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अथांग’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध आहे.