तृतीयपंथियांनी आपली क्षमता जगाला दाखवावी – पंकज भडागे
तृतीयपंथीयांनी सर्वात प्रथम स्वतःला स्वीकारले पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतयं, याच्या वरून तृतीयपंथीयांनी आपली पात्रता ठरवू नये; स्वतःला निराशेच्या, नशेच्या आहारी जाऊ न देता तृतीयपंथीयांनी आपल्या कृतीतून, जीवनशैलीतून आपली क्षमता, पात्रता इतरांना दाखवून द्यावी, असा सल्ला एमपॉवर माईंडसेट ट्रान्सफॉरमेशन अकॅडमीचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध माइंडसेट कोच पंकज भडागे यांनी तृतीयपंथीयांना दिला.
मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हिजडा समाजाच्या आत्मबल, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता’ या विषयावर पंकज भडागे बोलत होते. यावेळी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष रमोला देवासी, प्रेरणा वाघेला, कादंबरी शेख,काजल कुवर, प्रेरणा कुवर, लाची पुणेकर, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर, शनाया खुडे, एमपॅावर अकॅडमीचे शुभम कैरमकोंडा , मनाली झुंजाराराव आदी उपस्थित होते. या व्याख्यानाला समाजातील विविध स्तरात कार्यरत असणाऱ्या तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकज भडागे म्हणाले, तृतीयपंथीयांना पुढील आव्हाने ही इतर नागरिकांपेक्षा वेगळी आहेत. तृतीयपंथीयांनी प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. जग आपल्या बद्दल काय विचार करतयं, आपल्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले जाते; यावर विचार करून तृतीयपंथीयांच्या जीवनात कोणताही फरक पडणार नाही. स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तृतीयपंथीयांनी स्वतःला व त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांना स्वीकारणे गरजेचे आहे. अन् समाजापुढे एक चांगले उदाहरण घालून दिले पाहिजे.
तृतीयपंथीयांन मधूनच घडणार मोटीवेशनल स्पीकर
प्रसिद्ध लाइफ कोच पंकज भडागे यांनी यावेळी तृतीयपंथीयांन मधूनच मोटीवेशनल स्पीकर तयार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्याला मंगलमुखी कीन्नर चॅरिटेबल ट्रस्ट व उपस्थित तृतीयपंथीयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येणाऱ्या काळात तृतीयपंथीयांची एक वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार असून त्यातून पुढे येणाऱ्या काही स्पर्धकांना पंकज भडागे यांच्या मार्फत ट्रेनिंग दिले जाणार आहे. जेणे करून तृतीयपंथीयांना आणखी एक करियरची संधी उपलब्ध होईल तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्यातील व्यक्ती पुढे येतील जेणेकरून त्यांच्या समस्या लवकर सुटतील.