डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला आयोजन
अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर, निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे. याच आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी १८, १९ व २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत, अमोघ वाणीत श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राममंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे. १८ जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून, कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून, पुणेकर नागरिक, राम भक्तांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.”