टाळेबंदीनंतरच्या काळात विनोदी लेखनातील आव्हाने वाढली – जॉनी लिव्हर
“सध्या लोकांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अर्थात विनोद बुद्धी खूप वाढली आहे. टाळेबंदीच्या काळानंतर युट्यूब, टीकटॉक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांवर अगदी थोडक्यात आणि अधिक विनोदी कंटेंट लोकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या काळात कॉमेडी लिहणे हे लेखकांसमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. हल्ली लोकांना छोट्या मोठ्या गोष्टी सांगून हसवले जाऊ शकत नाही. त्यामुळे चित्रपटासाठी विनोदी संहिता लिहिताना अतिशय विचारपूर्वक लेखन करावे लागते,” असे मत प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी मांडले.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लिव्हर यांनी ‘ह्युमर इन सिनेमा’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते. कार्यक्रमात यांनी डॉ. पटेल यांनी जॉनी लिव्हर यांच्याशी संवाद साधला.यावेळी जॉनी लिव्हर यांनी आपल्या विनोदामागील प्रेरणा, हिंदी चित्रपट सृष्टीतील कामाचा अनुभव, अभिनयातील त्यांच्या अडचणी, आपल्या आई-वडिलांच्या आठवणी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील विनोदाचे सध्याचे स्थान अशा विविध विषयावर मनमोकळेपणाने भाष्य केले.विनोदीशैलीमध्ये काम करण्यासाठीची तुमची प्रेरणा कोणती याबद्दल बोलताना जॉनी लिव्हर म्हणाले, “विनोद शिकवला जात नाही, विनोदी व्यक्ती हे जन्मत: विनोदी असतात. तुमच्यामध्ये विनोदाचे कौशल्य असेल, तर प्रत्येक परिस्थितीत तो सहजपणे विनोद करू शकतो. मात्र यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपल्या आसपासच्या परिस्थितीचे निरीक्षण करणे. मला आठवते मी शाळेत शिकत असताना, दारूच्या दुकानावर देखील काम करायचो. तिथे दारू पिऊन दारुडी लोकं ज्याप्रमाणे वागायची, त्यांची प्रेरणा घेऊन, मी दारुड्या लोकांची विनोदी भूमिका करू लागलो. अशाच प्रकारे अन्य मद्रासी अथवा अन्य विनोदी भूमिकांची प्रेरणा ही मला आसपासच्या लोकांकडून मिळाली.”आपल्या वडिलांबाबतची आठवण सांगताना जॉनी लिव्हर म्हणाले, “माझे वडील स्वतः एक विनोदी व्यक्तिमत्त्व होते. माझे अनेक विनोद हे त्यांच्यामुळेच मला मिळाले. परंतु माझ्या वडिलांना मी कॉमेडी करायचो ते अजिबात आवडायचे नाही. एकदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे ३००० लोकांसमोर माझा विनोदाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी माझे वडील रबरी पाईप घेऊन मला मारायला आले होते. ते जसजसे स्टेजची एक एक पायरी चढत होते, मी भीतीने एक एक पाऊल मागे जात होतो. पण लोकांना वाटत होते, की हे दोघं काहीतरी नाटक करताहेत. त्यामुळे ते आणखी जोरात हसू लागले. ते पाहून माझे वडील गोंधळले आणि तिथून निघून गेले. नंतर त्यांनी आपला मुलगा नेमका काय करतो? याची माहिती घेण्यास सुरुवात केली, आणि नंतर हळू हळू त्यांचा माझ्या कामाबाबत’चा राग कमी झाला.”आपल्या अभिनयातील प्रवासाबाबत बोलताना जॉनी लिव्हर म्हणाले, “मिमिक्री कलाकारांना कॉपी करायचा आजार असतो. त्यामुळेच एक चांगला अभिनेता, कलाकार म्हणून घडताना त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागते. मला देखील विनोदी कलाकारातून अभिनेता बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. अनेकदा मी रात्र रात्रभर त्रस्त होत असत. कारण एखाद्या गोष्टीवर अभिनयाच्या अनुषंगाने व्यक्त होणे मला जमतच नसे. मात्र, त्यावेळी अनेक दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते यांनी मला सांभाळून घेतले, मला अभिनय करायला शिकविले. त्यामुळेच चित्रपटात मी यश मिळवू शकलो.”अभिनेता मेहमूद यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना अतिशय भीती वाटली होती, अशी प्रांजळ कबुली देखील त्यांनी दिली. विनोदी चित्रपटाबाबत जॉनी लिव्हर म्हणाले,” आज सर्वाधिक चित्रपट हे तंत्रज्ञानावर आधारित आहेत. मात्र चित्रपटात लोकांना विनोद हवाच असतो. प्रत्येक प्रकाराचा एक काळ असतो असे मला वाटते. जॉनी वॉकर यांच्या विनोदी चित्रपटाचा एक सुवर्ण काळ होता. मात्र मी चित्रपटात काम करण्यापूर्वी चित्रपटातून विनोदी भूमिका ही जवळपास नाहीशी झाली होती. सध्या तांत्रिक चित्रपटांचा काळ पुढे जाऊन विनोदी चित्रपटांचा काळ येईल, असा मला विश्वास आहे.”हिंदी चित्रपट सृष्टीत लेखन, अभिनय, दिग्दर्शन यामध्ये ‘चलता है ‘, ‘हो जयेगा ‘ ही संस्कृती जेव्हापासून आली आहे. तेव्हापासून हिंदी चित्रपट सृष्टी मागे पडली आहे आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी पुढे जात आहे. कलाकारांना कामाबाबत गांभीर्य राहिलेले नाही, याउलट भौतिक गोष्टी मिळविण्यावर लक्ष अधिक दिले जात आहे. पूर्वी एखाद्या कलाकारासोबत काम करण्याबाबत दिग्दर्शक कोणतीही तडजोड करत नसे, मात्र आज असे होताना दिसत नाही. ज्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीत कलाकार आपल्या कामासाठी शंभर टक्के मेहनत करतील, त्याचवेळी या चित्रपट सृष्टीला पुन्हा चांगले दिवस येतील, असेही जॉनी लिव्हर यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.ते पुढे म्हणाले, ” अलीकडे विनोदी कार्यक्रमांमध्ये पुरुष कलाकार हे महिला कलाकारांच्या भूमिकेत दिसतात आहे. पूर्वी मराठीत ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातदेखील हे करण्यात आले होते. पण ती त्या चित्रपटाची गरज होती आणि एक चांगली कलाकृती म्हणून ती अजरामर झाली. मात्र आज अशा प्रकारच्या भूमिकांमधून महिलांचा अपमान अधिक होत आहे, असे मला वाटते. त्याचबरोबर विनोदात शिवी, अपमानास्पद विनोद अधिक वापरले जात आहेत. मात्र ते कॉमेडी करण्यासाठी आहे, की कॉमडीशी कोणता सूड उगविण्यासाठी हेच आज कळत नाही. जेव्हा कलाकार अशा गोष्टींचा वापर करतात, तेव्हा त्यांच्याकडील विनोदी कौशल्य संपले आहे, असे समजावे.”