‘जीव तुझा झाला माझा’ सर्जा चित्रपटातील गाणे प्रदर्शित
‘सर्जा’ चित्रपटाच्या रूपात एक नवी कोरी म्युझिकल लव्हस्टोरी मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘सर्जा’ चित्रपटातील रोमँटिक गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आणण्यात आलं आहे. सोशल मीडियाद्वारे ‘सर्जा’चं पहिलं पोस्टर लाँच केल्यानंतर रोमँटिक गाणं रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘जीव तुझा झाला माझा…’ हे गाणं अल्पावधीतच नेटकऱ्यांची पसंती मिळवण्यात यशस्वी होत असून, सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालं आहे. राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. धनंजय मनोहर खंडाळे यांनी ‘सर्जा’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील ‘जीव तुझा झाला माझा…’ हे रोमँटिक साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. ‘फुलावानी हसू तुझं, मधावानी बोल… डोळ्याच्या या ढवामंदी मन गेलं खोल…’ असा या गाण्याचा मुखडा आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिलेलं हे गाणं संगीतकार हर्षित अभिराज यांनी अभय जोधपूरकर आणि वैशाली माडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. अर्थपूर्ण शब्दरचना आणि लयबद्ध संगीतरचना हे या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. अभय आणि वैशाली यांनी रोमँटिक शैलीत हे गाणं गायल्यानं संगीत प्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहे. ‘जीव तुझा झाला माझा…’ हे गाणं कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं असून, कथेतील एका प्रसंगाला अनुरूप असल्यानं ‘सर्जा’मध्ये घेण्यात आलं असल्याचं हर्षित अभिराज यांचं म्हणणं आहे. कथेतील अचूक प्रसंगावर चित्रपटात आलेलं हे गाणं एक प्रकारे सुरेल मेलोडीचा अद्भुत नजराणा असल्याचं मत दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी व्यक्त केलं आहे. सध्या मराठी तिकिटबारीवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘रौंदळ’ चित्रपटासोबतच ‘बबन’सारख्या म्युझिकल लव्हस्टोरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या हर्षित अभिराज यांनी ‘सर्जा’रूपी सुरेख प्रेमकथेला सुरेल गीत-संगीताची किनार जोडली आहे. दिग्दर्शनासोबतच धनंजय खंडाळे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही केलं असून, पार्श्वसंगीताची जबाबदारीही संगीतकार हर्षित अभिराज यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. राहुल मोतलिंग यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, प्रशांत प्रल्हाद शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. सुबोध नारकर यांनी संकलन केलं असून कला दिग्दर्शन सुनील लोंढे यांचं आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.