NEWS

जागतीक मानसिक आरोग्य दिन विशेष

Share Post

10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
जगभरात ६ ते १२ ऑक्टोबर हे दिवस मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून साजरा केले जातात . या आठवड्यात मानसिक आरोग्या बाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. असे कार्यक्रम करण्याची गरज आहे का? आपण जेवढें शारीरिक आजाराबद्दल सजग असतो तेवढं महत्व मानसिक स्वास्थ्याला देतो का ? सर्दी , ताप झाला कि डॉ. कडे पळणारे आपण मानसिक आजार व स्वास्थ्याच्या बाबतीत मात्र बेफिकिर असतो. जो पर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही , तो पर्यंत आपण त्याची दखल घेत नाही. आपण वर्तमान पत्र किंवा बातम्यांमधून ऐकतो वा आजूबाजूला बघतो कि सध्या उदासीनता व चिंता विकृतीच प्रमाण वाढत आहे. कोवीड नंतर बदललेल्या सामाजिक परिस्थिती नंतर ताणाचं प्रमाण वाढलेले दिसत आहे. प्रत्येक जण कुठल्यानां कुठल्या ताणाखाली आहे . काहींना ताण नीट हाताळता येतो, परंतु काहींना मात्र तो कसा हाताळावा हेच समजेनासं होत, त्यामुळे बाह्य जगात वावरतांना व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो व मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मानसिक आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव असणं नव्हे तर शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक स्वस्थता असणे. हे केव्हां शक्य आहे? रोजच्या आयुष्यात व्यक्ती ताणाची भरती ओहटी झेलत असते, मानसिक स्वास्थ्य चांगली असणारी व्यक्ती त्या लाटांवर स्वार होऊ शकते.

परंतु जर व्यक्ती सतत तणावग्रस्त असेल तर मात्र बरेचदा स्ट्रेस इन्डूस आजाराला बळी पडते. योग्य प्रमाणात ताण असणं व्यक्तीच्या विकासासाठी पोषक असतं परंतु बरेचदा अति ताण असेल तर मात्र घातक ठरतं. बरेचदा ताणासाठी परिस्थितीजन्य घटक, नौकरीतील तणाव, अनिमियत नौकरीच्या वेळा, कौंटुबीक तणाव, सततचे जागरण, आर्थिक तणाव व अनपेक्षित दुःखद घटना कारणीभूत असतात . सतत च्या ताणाने व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. चिडचिड वाढते, विचारात गोधंळ निर्माण होतो, झोप न येणं किंवा अति येणं, डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार, व स्मृती संदर्भातील अडचणी निर्माण होतात. सततच्या ताणाने मेंदूतील रसायनांमध्ये असंतुलन निर्माण होऊन मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक व्यक्तीमध्ये ताणाला हाताळण्याची आपली एक क्षमता असते परंतु काही वेळा ताणाचा निचरा नीट न झाल्यामुळे मनःस्वास्थ ढासळते. एखादी घटना किंवा प्रसंग तणाव निर्माण करत नाहीत तर आपण त्याचा कसा अर्थ लावतो यावर ताण आणि त्याची तीव्रता अवलंबून असते. यासाठी आपल्याला कशाने त्रास होतो, शारीरिक अस्वस्थतेची लक्षणे काय आहेत याची नोंद करावी. गरज भासल्यास समुपदेशक/मानोसोपचार तज्ञाची मदत घ्यावी. औषधांची आवश्यकता असल्यास ती नियमित घ्यावीत. व्यायाम, योगासने, प्राणायाम व चौरस आहाराला महत्त्व द्यावे. संगीत व छंद जोपासावेत. पुरेशी झोप घ्यावी आपले शरीर आणि मन निरोगी असेल तरच आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणू शकतो.


परिवर्तन संस्थेमार्फत मागील ३० वर्षांपासून मानसिक आजारी रुग्णांसाठी काम केले जाते आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर वरती संस्थेमार्फत काम केले जाते. संस्थेचे काम सातारा, पुणे व आसाम मधील तेजपुर या ठिकाणी चालते. यामध्ये ‘मानसरंग’ गटाच्या माध्यमातून आजार, आधार, उपचार व पुनर्वसन याचार सूत्रांना धरून कलेच्या माध्यमातून काम केले जाते. त्याच बरोबर प्रामुख्याने तीव्र स्वरुपाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सातारा, पुणे व तेजपूर या ठिकाणी डे केअर सेंटर चालविले जाते. या सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्यांच्या आजारावर मात करणे शक्य झाले आहे. या सेंटरमध्ये प्रामुख्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण काम केले जाते. यामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, एकत्र येऊन दिवाळी किट, गणपती किट, राखी असे सीझनल गोष्टी करून त्यातून रुग्णांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. त्याच बरोबर परिवर्तन मार्फत तीव्र मानसिक रूग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्पोरेशन, पुणे येथे ‘किमया कॅफे ’ सुरू करण्यात आला आहे तिथे मानसिक आजाराशी संघर्ष करणारे रुग्णमित्र- मैत्रिणी स्वतहा: सकाळी ८ ते रात्री ८ कॅफे चालवितात. शिवाय आजारातून सावरणा-या रुग्णमित्र-मैत्रिणींना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी लावून आर्थिक स्वावलंबी केले जाते.या रुग्णांसाठी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणे गरजेचे आहे त्यांना परत प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे ते केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व ते एक चांगलं आयुष्य जगू शकतात.यासाठी लोकांनी याविषयी जागरूक होऊन यारुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
“चला तर मग आपण स्वतः मानसिक आजाराविषयी माहिती घेऊया आणि इतरांनाही त्याविषयी माहिती देऊन सजग करूया. “

रेशमा कचरे
प्रकल्प समन्वयक
परिवर्तन संस्था,सातारा
45, कसबा पेठ, त्रिगुणेश्वर हाउसिंग सोसायटी, पहिला मजला, पुणे 411 011

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *