‘चौथा अंक’ रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र प्रकाशित
दिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. आपल्या आयुष्यातील चढ-उतारांचा भावनापूर्ण प्रवास त्यांनी या आत्मचरित्रात मांडला आहे. रवींद्र महाजनी यांचे निधन होण्यापूर्वी काही दिवस आधी या चरित्राचे लेखन पूर्ण झाले होते. वेगळे राहात असलेल्या रवींद्र यांनी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत येऊन राहावे असा आत्मचरित्राचा शेवट माधवी यांना करायचा होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते… अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.
माधवी यांचे जीवन इतके नाट्यपूर्ण राहिले आहे, त्यामुळे त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी, मुलगा गश्मीर हे नेहमी त्यांना याबाबत लिहिण्यास आग्रह करीत होते. अखेरीस माधवी यांनी आपल्या आयुष्याचा सर्व प्रवास ‘चौथा अंक’च्या रूपाने वाचकांसमोर आणलाच. या आत्मचरीत्राचे शब्दांकन लेखिका माधुरी तळवलकर यांनी केले, तर प्रस्तावना माधवी आणि रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर याने लिहिली आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेत या पुस्तकाचे प्रकाशन अगदी अनौपचारिक पद्धतीत आणि जवळच्या व्यक्तिंच्या सहवासात करण्यात आले.
आयुष्यात जे काही चांगलं घडलं ते सकारात्मक पद्धतीने मांडलं, तर ज्या गोष्टींमुळे त्रास झाला त्या घटना अगदी परखडपणे मांडल्या. कोणत्याही गोष्टी एकांगी न ठेवता सरळ आणि स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न या आत्मचरित्रात केल्याचे माधवी यांनी सांगितले. तर, रवींद्र महाजनी यांच्यासोबत जीवनात कितीही चढ-उतार आले असले तरी जन्मोजन्मी हाच पती म्हणून मिळावा अशी त्यांची आजही भावना आहे.
प्रकाशनावेळी माधवी यांच्या अगदी जवळच्या मैत्रिणी सुधा ओक, अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि लेखिका वर्षा काळे यांनी माधवी-रवींद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर गश्मीरने हृदय हेलावून टाकणारी प्रस्तावना वाचून दाखवली, तसेच बालपणीची एक भावनिक आठवणही सांगितली. ‘चौथा अंक’ या आत्मचरित्राचे काम तब्बल दोन वर्षं सुरू होतं. माधवी या आपल्या आठवणी सांगत असत, आणि मी त्या शब्दबद्ध करत, असे लेखिका माधुरी तळवलकर यांनी सांगितले.
आत्मचरित्राचे प्रकाशन माधवी महाजनी, मुलगी रश्मी महाजनी, गश्मीर महाजनी, सून गौरी महाजनी, नातू व्योम महाजनी अमित प्रकाशनचे अमित सातपुते, लेखिका वर्षा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.