चौकातल्या दोस्तीची नाळ, ‘जाळ जाळ’, गाणं झालं रिलीज
सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा… सध्या सगळीकडे फक्त ‘चौक’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. आता या चर्चेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे या चित्रपटातील ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्यामुळे! हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसू लागलं… त्यामुळे चौकची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्याचे संगीत, शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय. एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत, उत्साहाने नाचत, आनंद व्यक्त करत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार ‘जाळ जाळ झाला रे’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याच्या संगीतामुळे विशेष लक्ष वेधलं असून, संगीतकार ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे, तर डॉ. विनायक पवार यांच्या भन्नाट शब्दांनी अगदी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं आहे. तसेच, नागेश मोरवेकर यांच्या हटके स्टाईल गायनामुळे हे गाणं खूप व्हायरल होतंय. या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील डान्स! प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, यातील हूकस्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.
संपूर्ण गाण्याची लिंक (जाळ जाळ झाला रे)