‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांच्यासह नंदलाल मौर्य, विजय दगडे, गणेश थोरात,पूजा वाघ,अमिता धोपाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले,आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराच्या निमित्ताने जमा होणाऱ्या निधी मधून दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे.
तसेच मागील चार वर्षात आम्ही ४० पेक्षा अधिक मान्यवरांना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये आयपीएस कृष्णा प्रकाश, दिग्दर्शक दीग्पाल लांजेकर यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे. दिग्दर्शक, मेकअप आर्टीस्ट, फॅशन, अभिनय, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, मॉडेल, सामाजिक कार्यकर्ते, वास्तू तज्ज्ञ आशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे ठिकाण आणि तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे योगेश पवार यांनी सांगितले.