Entertainment

‘गोष्ट एका पैठणीची’ आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

Share Post

२०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा बहुमान मिळवला. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली. प्रेक्षकांनीही ‘गोष्ट एका पैठणीची’वर भरभरून प्रेम केले. पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची ही कहाणी आहे. ही सुंदर कहाणी प्रेक्षकांना ४ फेब्रुवारीपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटी पाहता येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पूर्ण सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नसेल. काही ठराविक पैसे भरून हा चित्रपट पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी व्हि.ओ. डी. म्हणजे व्हिडिओ ऑन डिमांड घेऊन आले आहे. व्हि. ओ. डी. असा प्रकार मराठी ओटीटीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे आवडते चित्रपट, वेबसीरिज, नाटक इ. पाहण्यासाठी पूर्ण सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नसेल. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवल्यामुळेच थिएटर बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकले होते. ‘गोष्ट एका पैठणीची’मधील इंद्रायणी महिला प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटली. घराघरातील ही कहाणी अनेकांना भावली. ज्यांचे इंद्रायणीला भेटायचे राहून गेले त्यांना आता ‘गोष्ट एका पैठणीची’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.” अभिनेत्री सायली संजीव म्हणते, “चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या व्यक्तिरेखेत स्वतःला शोधल्याचे अनेकींनी सांगितले. माझ्यासाठी हा क्षण खूप मौल्यवान होता. आता ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वात सुंदर भेट आहे. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.”मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे आहे. ययाती सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *