Entertainment

गोदावरी चित्रपटाची टीम पोहचली नदीसाठी नदीकाठी नाशिकमध्ये

Share Post

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली.

या वेळी जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. ‘गोदावरी’ नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात पाहायला मिळणार आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ ही श्रवणीय गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. उत्सुकता वाढवणारा ट्रेलर, जबरदस्त संगीत, दर्जेदार कथानक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ”राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता ‘गोदावरी’ आपल्या घरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा ‘गोदावरी’ संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने आमचे कुटुंब पुन्हा एकदा खळाळत्या नदीसाठी, नदीकाठी भेटलो आहोत.”

‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण ‘गोदावरी’ हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाशिकला येऊन ‘गोदावरी’नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने आमचे ‘गोदावरी’चे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले.
इथल्या गल्लीतून फिरताना पुन्हा चित्रीकरणाच्या त्या भावनिक आठवणी ताज्या झाल्या. नाशिकसोबत आता एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. विशेषतः गोदावरीसोबत. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता.

त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपली मोहोर उमटवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *