17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

गुरुपौर्णिमा उत्सवात गुरु-शिष्य परंपरा कीर्तन महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम

Share Post

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गुरुशिष्य परंपरा कीर्तन महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ जून ते सोमवार, दिनांक ३ जुलै दरम्यान मंदिरासमोरील उत्सवमंडपात हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी दिली.

कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर म्हणाले, कीर्तन महोत्सवाचे उद््घाटन रविवार, दिनांक २५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते होणार आहे. कीर्तन महोत्सवात ह.भ.प. रामनाथ अय्यर, मानसी बडवे, रेशीम खेडकर, नम्रता निमकर, शेखर व्यास, वासुदेव बुरसे, विश्वास कुलकर्णी, हर्षद जोगळेकर या दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हार्मोनियमवर कौस्तुभ परांजपे आणि तबल्यावर सोहम जोशी साथसंगत करणार आहेत. गुरु-शिष्य परंपरेची संकल्पना घेऊन विविध संप्रदायातील गुरु-शिष्यांच्या आख्यानांवर कीर्तन होणार आहे.

खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे म्हणाल्या, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दि. २८ जून रोजी रात्री ८ वाजता लुई ब्रेल अंध अपंग संस्थेचा कार्यक्रम, हटके म्युझिकल ग्रुपतर्फे दिनांक ३० जून, १ जुलै रोजी गीतरामायण आणि २ जुलै रोजी नाम रंगी रंगुनी हा कार्यक्रम रात्री ८ वाजता होणार आहे. दररोज सकाळी ६ ते ९ यावेळेत मंदिरामध्ये श्री गुरुचरित्र पारायण, उत्सव मंडपात दुपारी १ ते सायंकाळी ६ यावेळेत विविध भजनी मंडळांतर्फे भजनाचे कार्यक्रम आणि रात्री ८ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.