“खळगं” चित्रपट 29 सप्टेंबर 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित
सध्या सर्वत्र एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात व्यस्त आहेत. आजकाल मराठी चित्रपटही नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. प्रेक्षकांनीही मराठी सिनेमे पाहण्यासाठी आता चित्रपटगृहांची वाट धरली आहे. दरम्यान बराचसा प्रेक्षकवर्ग हा आता ग्लॅमरपेक्षा आता सत्यपरिस्थितीवर आधारित चित्रपटांकडे वळला आहे. अशातच गावखेड्यातील व सत्यघटनेवर आधारित एका नव्या
कोऱ्या चित्रपटाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणारा आणि समाजातील वास्तववादी बाजू मांडणाऱ्या ‘खळगं’ हा चित्रपट येत्या 29 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज होत आहे.
अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पेलवली आहे. ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.
गावखेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन चित्रपटात नवोदित कलाकारांनी चांगलाच कल्ला केला. माधवी जुवेकर , कार्तिक दोलताडे , सुलतान शिकलगार , रोशनी कदम , प्रज्वल भोसले , प्रितम भंडारे , कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे ,माणिक काळे , वैष्णवी मुरकुटे , ज्वालामुखी काळे , भैरव जाधव , संकेत कवडे , शिल्पा कवडे , मयूर झिंजे , मोहन घोलप , मंगेश ससाणे , ऐश्वर्या लंगे , गणेश शिंदे , शरद पवार या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. नवोदित अभिनेत्यांनी केलेला हा चित्रपट आहे असं त्यांचा अभिनय पाहून म्हणणं चुकीचं ठरेल, यांत शंकाच नाही. चित्रपटाच्या टिझरने या साऱ्यांची रंगत वाढवलीच आहे, आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शनाची. येत्या 29 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.