कुठल्याही घटनेला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या : मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांचा तरुणांना सल्ला
आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे. तसेच तरुणांनी स्क्रीन टाईम कमी करण्याची आवश्यकता आहे. आपला काही वेळ त्यांनी कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी दिला पाहिजे आणि आपली कमिटमेंट पाळली पाहिजे.प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता आहेत. पण आपण त्यांचा योग्य तितका, योग्य वेळी पुरेसा वापर करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घटनेला आपण प्रतिक्रिया देतो. त्याऐवजी आपण प्रतिसाद द्यायला शिकले पाहिजे. मग यश आपल्यापासून दूर नाही, असा मंत्र प्रख्यात मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांनी उपस्थितांना दिला. संवादी शैली, हलक्याफुलक्या विनोदाचा शिडकावा, सादरीकरणातील नाट्यमयता, विषयाचे नेमके भान आणि जाण अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे शर्मा यांचे कथन गर्दीने ओसंडून गेलेल्या सभागृहात विलक्षण परिणामकारक ठरले.
निमित्त होते, सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोनू शर्मा यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बंतारा भवन, बाणेर येथे करण्यात आले होते. द फाउंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन, संस्थापक जयप्रकाश गोयल, ईश्वरचंद गोयल, सचिव रविकिरण अग्रवाल, सहसचिव नरेंद्र गोयल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, समन्वयक कर्नल नरेश गोयल, मुकेश कनोडिया, संजय अग्रवाल तसेच पुणे जिल्ह्यातील विविध क्लब व संघटनांचे पदाधिकारी तसेच मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व अग्रवाल समाजाच्या क्लब व संधटनांना एकत्रित आणणे व अग्रवाल समाजाला एका माळेत जोडण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शन सम्मेलनाचे आयोजन केले गेले होते.