22/06/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कामगारांची लढाई ही भविष्यासाठी असून समस्त नोकरदार वर्गासाठी – जेष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर 

Share Post

उपोषण हे लढाईचे हत्यार आहे. हे हत्यार माणूस का उचलतो याच्या कारणांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. कामगारांची लढाई ही भविष्यासाठी असून समस्त नोकरदार वर्गासाठी आहे. ही लढाई अनेक लोकांच्या विरोधात लढायाला लागेल. या लढ्यात लागणारी सर्व कायदेशीर मदत मी करणार आहे, असे आश्वासन उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर यांनी दिले.

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा विरोधात तसेच कोरोना काळात नोकरी वरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर परत घ्यावे, यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेड, कष्टकरी कामगार पंचायत, भारतीय मजदूर संघ, रिपब्लिक पार्टी (आठवले गट), राष्ट्रवादी कॉँग्रेस, कामगार नेते आणि कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजिराव मुळीक आदींनी पाठिंबा दिला आहे. आज उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

वारुंजीकर म्हणाले, साधारण 1991 नंतर उदारीकरणाचे धोरण आले अन् भारतातील कायदे बदलायला सुरूवात झाली. जे कायदे कामगारांच्या बाजूने होते. ते कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने झाले. दुर्दैवाने कोरोंनाच्या काळात याचा फायदा सरकारच्या बरोबरीने कंपनी मालकांनीही उचलला. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जवळपास सर्वत्र क्षेत्रात कामगार कपात करण्यात आली. याला कुठेतरी वाचा फोडायची गरज आहे. कामगारांचा हा लढा केवळ आजचा नसून भविसयासाठीचा आहे. हा लढा अनेक लोकांच्या विरोधात लढावा लागणार आहे. तुम्ही जे गेल्या 12 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी इथे पाय रोवून उभे आहात हे खरंच कौतुकास्पद आहे. या लढ्यात जी काही कायदेशीर मदत लागेल ती मी करणार आहे.

दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव व राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या आंदोलनाची दखल घेतली, मात्र कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने हे उपोषण आज बाराव्या दिवशीही सुरूच आहे.