NEWS

कसबा विकास परिषद आयोजित करणार – रविंद्र धंगेकर

Share Post

गेली ३० वर्षे भाजपने कसब्यात मतदार संघाचा विकास केला नाही हे सत्य आहे. कसब्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. त्यांचा तो हक्कही आहे. मला स्वतःला या प्रश्नांची जाणीव असून कसब्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मी तयार करणार आहे. कसब्यातील रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, उद्याने, पार्किंग, जुन्या वाड्यांचा प्रश्न, सिग्नल व्यवस्था, भाजी मंडई,शाळा व क्रीडांगणे या नागरी सुविधांबरोबर मतदार संघातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण होणारे प्रश्न या सर्वांवर सविस्तर चर्चा करून उपाय शोधणे व कसब्याच्या विकासाचा स्वतंत्र विकास आराखडा करणे ,यासाठी कसबा विकास परिषद आयोजित करून निर्धारित वेळेत कसब्यातील नागरी प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहील.याचबरोबर या मतदारसंघातील तरुण-तरुणींना चांगला रोजगार मिळेल यासाठी नोकरी महोत्सव आयोजन, बेरोजगार नोंदणी कक्ष स्थापन करणे, बचत गटांची साखळी निर्माण करणे आदींसाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. स्थानिक नगरसेवक, महापालिका व नगररचना अधिकारी,तज्ञ मंडळी, नागरिक यांचा समावेश करून येथील विकासासाठी “कसबा विकास पॅकेज” राज्य शासनाकडे मागितले जाईल, असे महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज येथे सांगितले.पदयात्रा संपल्यानंतर नागरिकांशी ते बोलत होते . शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रभाग क्रमांक १७ रविवार पेठ ,रास्ता पेठ येथून सुरेश कांबळे यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस प्रारंभ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रविण कर्पे, सुरेश कांबळे,राजू शेख,चंदन सुरतवाला, रमेश अय्यर,शिवराज भोकरे,संदीप आटपाडकर,निलेश मोता तर राष्ट्रवादीचे दत्ता सागरे, गणेश नलावडे, राजेंद्र आलमखाने, सनी किरवे, भाऊ करपे, दीपक जगताप आणि शिवसेनेचे विजयाताई मोहिते मनोज यादव, अनिल खैरे, अतुल कच्छावे, आनंद कदम, अनिल डांगी आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. सुरेश कांबळे यांच्या कार्यालयापासून निघालेली ही पदयात्रा जगोबा दादा तालीम चौक, विजयानंद टॉकीज, नेहरू चौक ,सतरंजीवाला चौक, गोविंद हलवाई चौक ,पांगुळ आळी, अजमेरखान चौक ,व गोकुळ वस्ताद तालमी येथे आल्यानंतर पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत ‘मी रवींद्र धंगेकर’ अशा‌ टोप्या घातलेले तरुण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.तसेच भाजपा मुक्त कसबा असा मजकूर लिहिलेले गॅसचे फुगे औत्सुक्याचा विषय बनले होते. तीनही पक्षांचे झेंडे,धंगेकर यांनी केलेल्या विकास कार्याचे फलक,त्याचबरोबर फटाक्यांचा दणदणाट, याशिवाय पदयात्रेचे चौकाचौकात जंगी स्वागत होत होते. मार्गावर ठिकठिकाणी व्यापारी हार व गुच्छ देऊन धंगेकर यांचे स्वागत करीत होते. कष्टकरी वर्गातील महिला त्यांचे औक्षण करत होत्या. नागरिक उभे राहून त्यांचे स्वागत करत असतानाच गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून धंगेकर यांच्या जयजयकाराच्या घोषणांचा निनाद संपूर्ण पदयात्रेत घुमत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *