कलाकारांनी माणूस म्हणून भूमिका बजावली पाहिजे -अभिनेते सिध्देश्वर झाडबुके
अभिनय क्षेत्रात काम करत असताना इतर चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट पाहणे गरजेचे आहे. शिवाय उत्तम कथा,पटकथा,संवाद असलेल्या कलाकृती कलाकार म्हणून पाहणे गरजेचे आहे.कलाकारांनी माणूस म्हणून कलाकृती आणि भूमिका बजावली पाहिजे. कलाकारांनी भूमिकेचा किंवा पात्राचा चष्मा लावताना स्पर्धा ही स्वतःशीच करायला हवी.असे प्रतिपादन अभिनेते सिध्देश्वर झाडबुके यांनी केले.युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने दुसऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन आंबेगाव येथील कै.अभिजित कदम विरंगुळा केंद्र येथे करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. लघुपट हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो.मोठ्या कसोटीतून चित्रपट बनविला जातो.मोठ मोठे निर्माते दिग्दर्शक लघुपट बनवत असल्याचे चित्र आपल्याला दिसते आहे.लघुपट निर्मात्यांसाठी नोंदणी करून चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे चित्रपट होण्यासाठी निर्माते शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राजेभोसले यांनी दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.फुलचंद चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.युवा लघुपट महोत्सवात एकूण ६३ लघुपट सहभागी झाले होते.पैकी वीस नामांकन मिळालेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात आले.महोत्सवात ‘पिरॅमिड’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर देवा तुला शोधू कुठे या लघुपटास द्वितीय क्रमांक, तर ‘पेपर’ या लघुपटास तृतीय क्रमांक मिळाला.सत्यारंभ लघुपटास उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. कार्यक्रमास उपस्थित कलाकारांना श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टच्या वतीने मोफत खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी राजीव जगताप,समीर धनकवडे,प्रविण वनशिव,सागर बोदगिरे,बाळासाहेब धोका, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, संतोष ताठे,नितीन जांभळे,दिलीप जगताप,भाजपा नेते संदीप बेलदरे,मंगेश जाधव,संभाजी थोरवे युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, विश्वास सुर्यवंशी आदी उपस्थित होते.आकाश कदम,प्रबुद्ध प्रक्षाळे,गणेश कदम,प्रेम गरड,जयदीप निंबाळकर यांनी संयोजन केले.सूत्रसंचलन चैतन्य बनकर यांनी केले.