NEWS

कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Share Post

पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते. येथे काम करण्यासाठी मोठी स्पेस आहे. एखादा प्रश्न आपण वरिष्ठ नेते म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्यासमोर घेऊन गेलो की ते प्रश्न लगेच मार्गी लागतात. वाशी येथे धो धो पावसातही सुधीरजी मुनगंटीवार साहेब पुरस्कार द्यायला आले.

पुढे त्या म्हणाल्या, ”मला अभिनय क्षेत्राची खूप मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे मला चित्रपट क्षेत्रातील अत्यंत खालच्या घटकांपासून वरपर्यंतच्या सर्वच घटकांची म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लाईटमन, स्पॉटबॉय यांची बारीकसारीक माहिती आहे. या सगळ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून खूप जवळून मी पाहिल्या आहेत. अनेकदा कलाकारांना वेगळी वागणूक दिली जायची, तंत्रज्ञ यांना वेगळी वागणूक दिली जायची. यांना जेवण देखील खूप हीन दर्जाचे दिले आहे जायचे. माझ्या वडिलांनी अनेकदा खिशातील पैसे खर्च करून या घटकांसाठी काम केले आहे. त्यांच्यामुळे या सर्व घटकांविषयी मला तळमळ आहे. या सर्व मुद्यांवर मी खूपदा भांडले आहे. मला पहिल्यापासून या लोकांसाठी काहीतरी आपण पुढाकार घेऊन करावे असे वाटत होते. कोरोनाच्या काळात ही संधी मला उपलब्ध झाली. या काळात कलाकार, तंत्रज्ञान व अभिनय क्षेत्रातील लोकांची वाईट अवस्था झाली होती. कोरोनाच्या काळात ज्युनिअर आर्टिस्ट, हेअरस्टाईलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, स्पॉटबॉय अशा अनेक लोकांची कामे गेली. या काळात लक्ष्य कला मंच, श्रीमंथ इंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थामार्फ़त मी आणि माझे बिझनेस पार्टनर अमर गवळी आम्ही सर्व लोकांना फूड पॅकेट पुरविण्यापासून ते जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. तसेच पुणे इतर ठिकाणच्या 100 लोकांचा विमा देखील उतरवला.

पुढे त्या म्हणाल्या, ” राज्यातील 600 सिंगल स्क्रिन थिएटरची दुरवस्था झाली आहे. यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके थिएटर सुरू आहेत. मल्टीफ्लेक्समध्ये तर आम्हाला शोच मिळत नाहीत. थिएटर दिले तरी आम्हाला शो मिळतच नाहीत. आणि शो जर दिले तर मोठी बिग बजेटची इंग्लिश किंवा हिंदी फिल्म आली तर मराठी चित्रपटांसाठी त्यांच्या पाया पडावे लागते ते ही आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय करायचे कलाकारांनी, कसे जगायचे? सध्या आम्ही पाठपुरावा करून एक खूप मोठे काम केले आहे. आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगुटीवर साहेब यांनी नाट्यगृहासाठी 25 कोटींचे अनुदान घोषित केले आहे. यामुळे नाट्यगृहांमध्ये सुधारणा होईल. तमाशा व लोककलावंत यांना कोरोना काळात अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. काहींना तर लोकांची धुणी-भांडी करावी लागली. कलाकारांची एवढी वाईट अवस्था पाहवत नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे साहेब यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हल्ले केले जातात, हे निषेधार्ह आहे. म्हणजे ज्या माणसाला आज जाऊन आता 18 ते 19 वर्षे झाली, तसेच ज्या माणसाचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे, अशा व्यक्तीवर ज्यांना काहीच बोलायचा अधिकार नाही. ज्यांची समाजात काहीच प्रतिमा नाही असे लोकं बेर्डे साहेबांवरती व्यक्त होतात याचेच मला नवल वाटते. याबद्दल तुम्ही मीडियाने देखील आवाज उठवायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *