Launch

ओटीटी विश्वात अमोल टीव्हीची धमाकेदार एन्ट्री

Share Post

मागील काही वर्षांपासून भारतीय मनोरंजन विश्वाचा अविभाज्य घटक बनलेल्या ओटीटीला कोरोनाकाळात नवसंजीवनी लाभल्यानं आज या विश्वाची पाळंमुळं रसिकांच्या मनात खोलवर रुजली गेली आहेत. थिएटरमधील सिनेमांच्या जोडीला ओटीटीवरील चित्रपटही प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करत आहेत. यासोबतच वेब सिरीजनंही रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रसिकांच्या सेवेत नवनवीन ओटीटी प्लॅटफॅार्म्स येत असल्यानं डिजिटल विश्वात तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. याच तगड्या स्पर्धेत प्रेक्षकांची आवड-निवड जोपासत लक्ष वेधून घेणारं कंटेंट सादर करण्याच्या उद्देशानं एक नवं ओटीटी रसिक दरबारी रुजू होत आहे. अमोल टीव्ही असं या नव्या ओटीटीचं नाव आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात सिटिप्राइड कोथरुडमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात लोगो लाँच करत अमोल टिव्हीची घोषणा करण्यात आली. मागील बऱ्याच वर्षांच्या कालावधीमध्ये सिनेनिर्मिती, नाट्यनिर्मिती, सिरीयलनिर्मिती ते वितरण असा देदीप्यमान प्रवास करताना राष्ट्रीय पुऱस्कारांनाही गवसणी घालणाऱ्या निर्माते संजय पारेकर आणि सचिन पारेकर यांनी अमोल टिव्हीची मुहूर्तमेढ रोवली आहे. या सोहळ्याला अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, श्री. अरविंद चाफळकर, श्री प्रकाश चाफळकर, आनंद पिंपळकर या मान्यवरांनी हजेरी लावली. अमोल टिव्हीबाबत संजय पारेकर म्हणाले की, निखळ मनोरंजनाचा अद्भुत नजराणा असं या ओटीटीचं वर्णन करणं योग्य ठरेल. आज जे मराठी ओटीटी प्लॅटफॅार्म्स रसिकांच्या सेवेत आहेत, त्यांच्यापेक्षा वेगळा आणि आजवर कधीही समोर न आलेला कंटेंट देण्याचं काम अमोल टिव्ही करणार आहे. नावाप्रमाणेच या ओटीटीवर आलेल्या कंटेंटचं मोल करता येणार नाही असंच मी म्हणेन. यावर सर्व प्रकारचे मनोरंजनपर कार्यक्रम दाखवले जाणार असून जगभरातील १९० देशांमध्ये याचे प्रसारण होणार आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना इथे नक्कीच काहीतरी आपलं वाटावं असं मिळेल याची तरतूद अमोल टिव्हीच्या माध्मातून करण्यात आली असल्याचंही पारेकर म्हणाले.

संजय पारेकर आणि सचिन पारेकर यांनी आजवर अमोल प्रोडक्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांची निर्मिती केली आहे. अमोल प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘लपंडाव’ या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. याशिवाय ‘शेजारी शेजारी’, ‘क्षण’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाची निर्मितीही अमोल प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. आता अमोल टिव्हीच्या माध्यमातून नवं पाऊल टाकत भविष्यात आणखी नेत्रदीपक वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *